नागपूर : विवाह हा राष्ट्रीय महोत्सव व्हावा, ही कल्पनाच मनाला न शिवणारी. मात्र, या संकल्पनेला मूर्त रूप देणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर आहेत. त्यांनी सांभाळलेल्या बेवारस, उपेक्षित दिव्यांग मूकबधिरांना पालकत्त्व बहाल केले आणि त्यांच्या भविष्याची तजवीजही करून ठेवली. त्याच उपक्रमातील त्यांच्या २४ व्या मुलीचा विवाह ठरला आहे. विशेष म्हणजे, या मुलीचा कन्यादान संस्कार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांची भार्या आरती देशमुख करणार आहेत.
शंकरबाबा पापळकर अमरावती येथून ६० किमी अंतरावर असलेल्या वझ्झर येथे स्व. अंबादासपंत वैद्य अनाथालय चालवतात. येथे वर्तमानात बेवारस व दिव्यांग, मूकबधिर अशा ९८ मुली व २५ मुले आहेत. यातीलच वर्षा ही एक मूकबधिर मुलगी. याच आश्रमात राहणारा समीर हाही एक मूकबधिर मुलगा आहे. वर्षा ही एक वर्षाची असताना नागपूर रेल्वे स्थानकावर सापडली तर समीर हा दोन तीन वर्षाचा असताना डोंबिवली मुंबई येथे सापडला. या दोघांनाही आपले नाव देऊन शंकरबाबांनी त्यांचे संगोपन करत स्वावलंबनाचे धडे दिले. दोघेही मोठे झाले आणि त्यांच्या भविष्याचा विचार सुरू झाला. या दोघांचाही विवाह २० डिसेंबर रोजी नागपुरात ठरला आहे. हा सोहळा राष्ट्रीय महोत्सवासारखा साजरा व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. हेतू हाच की दिव्यांग, मूकबधिरांच्या पुनर्वसनाचा कायदा व्हावा. या सोहळ्यात गृहमंत्री देशमुख दाम्पत्य आपल्या शब्दाला जागत कन्यादान संस्कार पार पाडणार आहेत. सोहळ्याच्या माध्यमातून १८ वर्षावरील दिव्यांग बेवारस मुलामुलींना आजीवन पुनर्वसनाकरिता बालगृहात राहू द्यावे, असा भारत सरकारने कायदा करावा, असा आग्रह धरला जाणार आहे.
कायदा हाच माझा पुरस्कार - शंकरबाबा
शासनाने अनेकदा मला पुरस्कार जाहीर केले. परंतु, कायदाच होणार नसेल तर त्या पुरस्काराचे काय करू. हा दिव्यांग, मूकबधिर बेवारस पुनर्वसनाचा कायदा होणे हाच माझा पुरस्कार असल्याची भावना शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली.
२५ नातवंडांचे आजोबा
शंकरबाबांनी आतापर्यंत आश्रमाच्या माध्यमातून २३ बेवारस दिव्यांग मुलींचे लग्न लावून दिले आहे. त्यातील १८ मुलींना सुदृढ अशी मुले झाली असून, २५ नातवंडांचा आजोबा असल्याचे ते आनंदाने सांगतात. कोणतीही शासकीय मदत नाकारात ते केवळ शेगाव देवस्थान व हनुमान व्यायाम शाळेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवत आहेत.