नागपूर : रामटेक विधानसभेतील काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे व माजी सभापती हर्षवर्धन निकोसे यांची शिंदे-फडणवीस सरकारने नागपूर जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे या दोन नियुक्त्या करण्यासाठी भाजपचे संदीप सरोदे (काटोल) व रुपराव शिंगणे (हिंगणा) यांची जिल्हा नियोजन समितीवरील सदस्य म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांना खूश करण्यासाठी भाजपने आपल्या दोन कार्यकर्त्यांची गच्छंती केल्याची चर्चा भाजप वर्तुळात जोरात सुरू आहे.
महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या शांता कुमरे या रामटेक विधानसभेतील बेलदा या जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य आहेत. त्यांची आदिवासी समाजात पकड आहे. यावेळी जिल्हा परिषदेत अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्यांचा दावा मजबूत मानला जात होता; पण माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून पाटणसावंगीच्या मुक्ता कोकड्डे यांचे नाव फायनल झाले.
समाज कल्याण सभापतीपदीही कुमरे यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे कुमरे काँग्रेसवर नाराज होत्या. नेमकी हीच संधी शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल यांनी साधली. जयस्वाल यांच्या शिफारशीवरूनच कुमरे यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन निकोसे हे काँग्रेसकडून समाज कल्याण सभापती होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असून आ. जयस्वाल यांच्याशी त्यांची जवळीक वाढली आहे. रामटेक विधानसभेवर डोळा ठेवून आ. जयस्वाल यांनी या दोन्ही नियुक्त्या करून घेतल्याची माहिती आहे.
कुमरे म्हणतात, काँग्रेस सोडणार नाही
- शिंदे-फडणवीस सरकारकडून जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून झालेल्या नियुक्तीबाबत शांता कुमरे म्हणाल्या, या नियुक्तीची मला कल्पना नव्हती. आ. जयस्वाल यांच्याकडूनच नाव गेले असावे. यापूर्वीही त्यांनीच आदिवासी प्रकल्प स्तरीय आढावा समितीवर मला सदस्य म्हणून नेमले होते. नियुक्ती झाली आहे तर विकासकामे करण्यासाठी त्याचा उपयोग करीन; पण मी काँग्रेस सोडणार नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
शिंदे गटासाठी जागा मोकळी केली : सरोदे
- भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असलेले संदीप सरोदे म्हणाले, काटोल व हिंगणा विधानसभा मतदारसंघातून जिल्हा नियोजन समितीवर प्रत्येकी दोन सदस्य नेमण्यात आले होते. यापूर्वी समितीत शिंदे गटाला प्रतिनिधित्व दिले नव्हते. आता शिंदे गटाला दोन जागा देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे माझे व रूपराव शिंगणे (हिंगणा) यांचे नाव कमी करण्यात आले. पक्षाने घेतलेल्या निर्णयावर आपली कुठलीही नाराजी नाही, असेही सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.