नागपूर: शरद पवार व उद्वव ठाकरे यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या पक्षाची अवस्था गंभीर आहे. दोन्ही नेत्यांच्या गटांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नाही, अशी स्थिती असून त्यामुळेच ते ही जागा याला सोड, ती जागा त्याला सोड अशी भूमिका घेत आहे. येत्या काळात मविआच्या घटक पक्षातून मोठे पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट महायुतीच्या घटक पक्षात होतील, असा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदींना १५० देशांनी नेता म्हणून मान्यता दिली. जी-२० च्या आयोजनातून भारताची शक्ती जगाला कळली. चीनमधून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातून मोदीची प्रशंसा केली जात आहे. पाकिस्तान वगळता सर्वच देश मोदींची स्तुती करीत आहे. अशा वेळी पाकिस्तान आणि उद्धव ठाकरे हेच मोदींच्या कामाने आनंदी नाहीत. परंतु एक दिवस असा येईल ज्या दिवशी उद्धव ठाकरेही मोदींची स्तुती करतील. विकास म्हणजे काय हे कळण्यासाठी आणि टीका करण्यापूर्वी त्यांनी मुंबईत झालेला अटल सेतू उद्घाटनाचा कार्यक्रम पहायला हवा होता, असा सल्लाही त्यांना दिला.
बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा दिवसप्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्येत पूर्णत्वास जात असताना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांची पूर्तताही होत आहे. मात्र, या सोहळ्याचे निमंत्रण भेटूनही उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत. काँग्रेसनेही बहिष्कार केला आहे. हिदुत्व विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला उद्धव ठाकरे हे साथ देत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली. राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे कार सेवक म्हणून काम करत होते, तर उद्धव ठाकरे हे फोटोग्राफी करीत होते, असा चिमटाही त्यांनी काढला.
जागावाटपाबाबत अद्याप निर्णय नाहीभंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाने दावा केला आहे, याकडे लक्ष वेधले असता बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये लोकसभेची कोणती जागा कोणता पक्ष लढविणार हे ठरलेले नाही. पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळात याबाबतचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.