नागपूर : अंधेरीतील पोटनिवडणुकीत लटके यांना समर्थन देण्याचे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले. निवडणूक अविरोध झाल्यास त्याचे श्रेय राज ठाकरे यांना जाऊ नये म्हणूनच शरद पवार यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली, असा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
राज ठाकरेंनी पत्र लिहल्यावर भाजपने उमेदवारी मागे घेतली, हे सर्व ठरवून करण्यात आले, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना देशपांडे म्हणाले, संजय राऊत यांच्याकडे आता बराच वेळ असल्यामुळे ते वाट्टेल ते लिहत असतात, आणि आमच्यावर ‘स्क्रिप्ट’ लिहिल्याचा आरोप करतात.
दिवाळी तोंडावर आली तरीही नागरिकांना रेशनची किट मिळालेली नाही. या टेंडरमध्येच घोळ असल्याची माहिती समोर येत असल्याचे सांगत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
नागपुरात २४ तास पाणीपुरवठ्याचे काय ?
- नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात पुरेसे पाणी मिळत नाही व बील मात्र भरमसाठ येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. येत्या काळात ही परिस्थिती सुधारली नाही तर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना मनसे रस्त्यावर फिरु देणार नाही, असा देशपांडे यांनी दिला. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष विशाल बागडे व चंदु लाडे उपस्थित होते.
नागपुरात ४५० पदाधिकाऱ्यांची यादी तयार
- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर पक्ष संघटन बांधणी व नागपूर शहर कार्यकारिणी नियुक्त करण्यासाठी संदीप देशपांडे, अविनाश जाधव, राजू उंबरकर मंगळवारी नागपुरात दाखल झाले. रविभवनातदिवसभर त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे म्हणाले, यावेळी विचरपूर्वक व संपूर्ण माहिती घेऊन नियुक्त्या केल्या जात आहेत. आमच्याकडे नागपुरातील ४५० पदाधिकाऱ्यांची यादी तयार आहे. मात्र, मनसेला कार्यकर्ते मिळत नाही, अशा चुकीच्या बातम्या हेतूपूरस्स पसरविल्या जात असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. लवकरच राज ठाकरे यांच्याहस्ते नागपुरात मुख्य कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.