नागपूर : बारामतीतील घड्याळ बंद पाडू, असे म्हणण्यामागे शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणे हा भाजपचा हेतू नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. पण पवार हा मुद्दा वैयक्तिकरित्या घेऊन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपने अमेठी जिंकून दाखवली. त्यामुळे बारामती काही कठीण नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
वेगळ्या विदर्भावर कायम
- भाजपची वेगळ्या विदर्भाची भूमिका आजही कायम आहे. जेव्हा हा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजप ताकदीने वेगळ्या विदर्भ राज्याचे समर्थन करेल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा
- भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करणार आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, दिव्यांगाना मदत असे विविध उपक्रम राबिवण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या जीवन कार्याविषयी ठिकठिकाणी प्रदर्शन आयोजित केले जाईल. एवढेच नव्हे तर देशाच्या एकात्मतेची भावना रुढ होण्यासाठी भाजपचे पदाधिकारी एक दिवस अन्य राज्यांप्रमाणे आहार, भाषा अशा सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेतील. २५ सप्टेंबर रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करतील. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जंयती २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक धोटे आदी उपस्थित होते.