नागपूर - मी टीव्हीवरील मुलाखतीनंतर मित्र म्हणून सल्ला दिला होता. काहीही करा पण शरद पवारांचा नाद करु नका, पण केला. अहो, सगळ्या पवारांना कळायंला तुम्हाला 10 जन्म घ्यावे लागतील. अगदी कुस्तीच्या आखाड्यात म्हणाले की, पवार पॅटर्न संपला. पण, पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, पवार हे आडनाव जरी असलं तरी तो एक विचार आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आमदारधनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
विधानसभेचे आमदार झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा हे पहिलच अधिवेशन आहे. आपल्या अधिवेशनातील पहिल्याच भाषणात धनंजय मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. शिवसेनेला दिलेला शब्द न पाळल्याचे सांगत आम्हाला तुम्ही शब्द पाळायचे शिकवू नका, असे फडणवीस म्हणाले. भाजपाचे 105 आमदार निवडून येऊनही सत्तेत नसल्याची उद्विग्नता फडणवीसांकडे पाहून दिसून येते, असे म्हणत घणाघाती शाब्दिक हल्ला केला. तसेच, मुख्यमंत्रीपदाचा शब्द तुम्ही पाळला नाही, कपट तुम्ही केलं आणि आज हे सरकार कपटाने आलंय, असे तुम्ही म्हणताय. तुम्ही कसही, कुठलही कपट करायचं अन आम्हाला दिलेला शब्द पाळायचा असं तुम्ही सांगतात, असे म्हणत मुंडेंनी फडणवीसांवर टीका केली.
फडणवीस यांनी शरद पवारांबद्दल शिवसेनेचं मत काय होतं, हे सामना या मुखपत्रात छापून आल्याचा संदर्भ देत पेपरची जुनी कात्रण सभागृहात आणली होती. पवारांबद्दल मला नितांत आदर आहे, असे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीकाच केली. मात्र, धनंजय मुंडेंनी यावरुन फडणवीसांना टार्गेट केलं. शरद पवार हा एक विचार आहे, तो विचार कधीच संपत नसतो, असे मुंडेंनी म्हटले. तसेच, मित्र म्हणून मी त्यांना सल्ला दिला होता, कुणाचाही नाद करा पण पवारसाहेबांचा नको, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षण देण्याचे क्रेडीट भाजपकडून घेण्यात येते. या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी विधानसभेत भाजपवर टीका केली. तसेच आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्यांच्या पाठिशी महाविकास आघाडीचे सरकार उभे राहिल, अशी ग्वाहीही मुंडे यांनी दिली. मराठा समाजाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे सभागृहात अभिनंदन केले होते. मात्र, मराठा समाजाला खरं आरक्षण पंढरपूरच्या विठ्ठलाने दिल्याचा दावा मुंडे यांनी केला.