शरद पवार म्हणतात महाविकास आघाडी पण पटोले म्हणतात काँग्रेसला माहीतच नाही
By कमलेश वानखेडे | Published: August 31, 2022 06:01 PM2022-08-31T18:01:01+5:302022-08-31T18:03:47+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत नाना पटोले यांची स्पष्टोक्ती
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी मिळून लढणार व यावर चर्चा सुरू आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केले होते. पण याबाबत काँग्रेसला काहीच माहीत नाही, असे आश्चर्यकारक वक्तव्य नाना पटोले यांनी बुधवारी केले. ते शरद पवार यांचे मत आहे. काँग्रेस स्थानिक पातळीवरील नेत्यांशी बोलून याबाबतचा निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पटोले यांच्या परिवारात बुधवारी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महागाई वाढली आहे. गेल्या सात आठ वर्षांत मुठभर लोकं श्रीमंत झाली, गरीब आणखी गरीब व्हायला लागलाय. ही दरी निर्माण होण्याचे नेमके कारण काय. केंद्र सरकारने तरुण, शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत द्यायला पैसा नाही, आणि वेगवेगळ्या कामात खर्च केला जात आहे. राजकारण पाहूण सरकार निर्णय घेत आहे. या सरकारने मराठा तरुणांसाठी नोकरी बाबात जे धोरण स्वीकारलं, त्याला विरोध नाही. पण त्यासाठी वेगळा निधी देण्याची मागणी त्यांनी केली. गोहाटीत काय तमाशा झाला हे माहित आहे. हे नेते सत्ता एन्जॅाय करीत आहे. प्रदुषण कोणी केलं हे जनतेला माहित आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
राज्यात काँग्रेसच मोठा पक्ष राहणार
मधल्या काळात डोकी फिरवून काँग्रेस कमजोर करण्याचा प्रयत्न केला गेला. पण महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष होता आणि राहणार, असेही पटोले यांनी ठासून सांगितले.