लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पण ते शक्य नाही. शरद पवार बोलताना काहीही बोलोत, पण ते कोणती गोष्ट करतील काही सांगता येत नाही. ते केव्हा कोणत्या पक्षासोबत युती करतील याचाही नेम नाही. ते फार गूढ अंतकरणाचे आहे, त्यामुळे त्यांना समजणे फार कठीण असल्याचे मत माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी व्यक्त केले.सन्मित्र सभेतर्फे आयोजित व्याख्यानमालेत ‘अवघे पाऊणशे वयमान’ या विषयावर बोलताना मनोहर जोशी बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दि ब्लाईंड रिलिफ असोसिएशनचे अध्यक्ष निखील मुंडले, सन्मित्र सभेचे अध्यक्ष डॉ. संजय घटाटे, सचिव प्रा. अरविंद गरुड, प्रभाकर बेलसरे उपस्थित होते. व्याख्यानाला सुरूवात होण्यापूर्वी सोमलवार निकालस शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी तनुजा नाफडे यांचा सत्कार मनोहर जोशी यांच्याहस्ते करण्यात आला. ते व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हणाले की अवघे पाऊणशे वयमान हे मी लिहिलेले पुस्तक आहे. आयुष्याचे पाऊणशे वय गाठल्यानंतर काय करावे ज्यामुळे जीवन आनंदी होईल, याचे तत्त्वज्ञान पुस्तकात मांडले आहे. यावेळी त्यांनी जीवनात कसे यशस्वी होता येईल, याच्या टीप्स दिल्या. भरपूर अभ्यास करा, इच्छाशक्ती बाळगा, सतत काम करा, मेहनत करा, मार्ग सहज सापडतील, आयुष्यात मोठे होणाचा हा मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकींना राहणारा उमेदवार हा पदवीधर असावा, अशी भूमिका मांडताना ते म्हणाले की, शिक्षित माणसाला समाजाची दु:ख चांगल्याप्रकारे कळतात. स्वत:बद्दल बोलताना ते म्हणाले की, शिक्षणाची सोय नसतानाही मी शिक्षण घेतले, राजकारणी बनलो, उद्योजक बनलो, आता लेखकही बनलो पण हे केवळ वाचनामुळे, त्यामुळे भरपूर वाचन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन शिल्पा नंदनपवार यांनी केले.शिवसेनेत जातपात चालत नाहीमराठी माणसाना प्राधान्य द्या, हे शिवसेनेचे व्रत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कधीच शिवसेनेत जातपात पाळली नाही. त्यांनी कधीच जातीचे भांडवल केले नाही. त्यांच्यामुळेच मला मानाची पदे भूषविता आली, असे जोशी म्हणाले.