नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्यापासून (दि. १७) विदर्भ दौऱ्यावर आहेत. पक्षाच्यावतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून रणनीती आखणार आहेत.
शरद पवार यांच्या विदर्भ दौऱ्यामुळे राकाँच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. पवार चार्टर्ड विमानाने नागपूरला येत आहेत. बुधवारी दुपारी ३ वाजता शहरातील व्यावसायिकांसोबत ते रामदास पेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे चर्चा करतील. त्यानंतर साडेचार वाजता येथेच ते पत्रकारांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर साडेपाच वाजता वर्धमाननगर येथील सात वचन लॉन येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पवार विदर्भ दौऱ्यादरम्यान नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत. त्यांचा दौरा यशस्वीरीत्या पार पडावा म्हणून गणेशपेठेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रदेश आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.