विदर्भातही घड्याळाचे काटे फिरले, जिल्हा-शहर अध्यक्ष वेगवेगळ्या तंबूत
By कमलेश वानखेडे | Published: July 5, 2023 10:31 AM2023-07-05T10:31:28+5:302023-07-05T10:33:54+5:30
आज मुंबईत ‘बैठक परीक्षा’ : कुणी जयंत पाटील तर कुणी सुनील तटकरे यांच्या बैठकीला जाणार
कमलेश वानखेडे
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे. आमदारांनी वेगवेगळी वाट धरल्यानंतर आता जिल्हा व शहर अध्यक्षही वेगवेगळ्या तंबूत दाखल झाले आहेत. काही शहर व जिल्हाध्यक्षांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला असून काहींनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार, ५ जुलै रोजी दोन्ही प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व सुनील तटकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या बैठका ठेवल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्हा व शहर अध्यक्षांची बैठक परीक्षा होणार असून ते कोणत्या गटात सामील होतात, हे स्पष्ट होणार आहे.
नागपूरचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर सोमवारी जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले बाबा गुजर यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव व नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश शिंदे यांनीही मंगळवारी दुपारी मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेत समर्थन दिले. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेची तिकीट न मिळाल्याने शिंदे हे अनिल देशमुख यांच्यावर नाराज होते.
वर्धा जिल्ह्यातील शहर व जिल्हाध्यक्ष दोघेही शरद पवार यांच्या बाजूने आहेत. जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठरावही संमत करण्यात आला. जिल्हाध्यक्ष सुनील राऊत व शहर अध्यक्ष मुन्ना झाडे हे जयंत पाटील यांच्या बैठकीला जाणार आहेत.
अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे हे अजित पवार यांच्या बैठकीला जाणार आहे. तर जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांचा ‘नो रिप्लाय’ आहे. गडचिरोलीचे दोन्ही अध्यक्ष अजित पवार यांच्या बाजूने आहेत. अकोला जिल्हा विभागला असून बुलढाण्याचे दोन्ही अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर वाशिम जिल्हा अजित पवार यांच्या बाजूने आहे.
भंडारा-गोंदिया प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत
- गोंदिया जिल्ह्यातील शहर व जिल्हाध्यक्षांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास दाखविला आहे. गोंदिया जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर व शहराध्यक्ष अशोक सहारे हे सुनील तटकरे यांच्या बैठकीला जाणार आहेत. यासोबत सर्व तालुकाध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधीदेखील अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा या दोन्ही अध्यक्षांनी केला आहे.
भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे हे पदाधिकाऱ्यांसह सुनील तटकरे यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शहराध्यक्ष हेमंत महाकाळकर हे खासगी कामामुळे बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र जायचे झालेच तर ते सुद्धा तटकरे यांच्या बैठकीला उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले.
कोण कुणासोबत ?
नागपूर
शहर अध्यक्ष - दुनेश्वर पेठे - शरद पवार
जिल्हाध्यक्ष - बाबा गुजर - अजित पवार
भंडारा
शहर अध्यक्ष - हेमंत महाकाळकर- अजित पवार
जिल्हाध्यक्ष - नाना पंचबुद्धे - अजित पवार
गोंदिया
शहर अध्यक्ष - गंगाधर परशुरामकर- अजित पवार
जिल्हाध्यक्ष - अशोक सहारे- अजित पवार
गडचिरोली
शहर अध्यक्ष - विजय गोरडवार - अजित पवार
जिल्हाध्यक्ष - रवींद्र वासेकर - अजित पवार
चंद्रपूर
शहर अध्यक्ष - राजीव कक्कड- शरद पवार
जिल्हाध्यक्ष - राजेंद्र वैद्य- शरद पवार
वर्धा
शहर अध्यक्ष - मुन्ना झाडे - शरद पवार
जिल्हाध्यक्ष - सुनील राऊत - शरद पवार
अमरावती
शहर अध्यक्ष - प्रशांत डवरे - अजित पवार
जिल्हाध्यक्ष - सुनील वऱ्हाडे - संभ्रमात
यवतमाळ
शहर अध्यक्ष - पंकज मुंदे- अजित पवार
जिल्हाध्यक्ष - बाळासाहेब कामारकर - अजित पवार
अकोला
जिल्हाध्यक्ष - संग्राम गावंडे - शरद पवार
शहर अध्यक्ष- विजय देशमुख- अजित पवार
बुलढाणा
जिल्हाध्यक्ष- ॲड. नाझेर काझी - शरद पवार
शहर अध्यक्ष- अनिल बावस्कर - शरद पवार
वाशिम
जिल्हाध्यक्ष- चंद्रकांत ठाकरे - अजित पवार
शहर अध्यक्ष- (पद रिक्त)
--