नागपूर - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात आज, मंगळवारी विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चापूर्वीच राष्ट्रवादीने विदर्भात सरकारविरोधी वातावरण तापविण्यासाठी १ डिसेंबरपासून यवतमाळ येथून हल्लाबोल दिंडी पदयात्रा सुरू केली. ११० किलोमीटरचा प्रवास करीत ११ व्या दिवशी ही दिंडी सोमवारी सकाळी नागपूर शहराच्या हद्दीत दाखल झाली.
विरोधी पक्षांतर्फे सरकारविरोधात आज काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे 12 डिसेंबरला शरद पवारा यांचा वाढदिवस आहे. पवार यांनी आज 77 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पवारांनी आधीच राजकारणात 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या राजकीय प्रवासात शरद पवारांनी महाराष्ट्र आणि केंद्रात अनेक महत्त्वाची पदं भूषणली आहेत. तब्बल 37 वर्षांनंतर शरद पवार हे वाढदिवसादिवशी नागपूरच्या रस्त्यावर आंदोलनात उतरल्याचे पहायला मिळणार आहे. शरद पवार यांनी 1980 मध्ये मुख्यमंत्री ए. आर. अंतुले सरकारच्याविरोधात ऐतिहासिक मोर्चा काढला होता. तेव्हा शरद पवार यांनी पुलोदचे नेतृत्व केले होते. या मोर्चाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकरी आणि सामान्यांच्या विषयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चाचं आयोजन केलं आहे.
चव्हाण तळ ठोकून राष्ट्रवादीही सज्ज- मोर्चाच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण महिनाभरापासून राज्यभरात पदाधिका-यांच्या बैठका घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते नागपुरात तळ ठोकून आहेत. कोणत्या जिल्ह्यातून किती लोक येणार याचा पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. गेल्यावर्षी चव्हाण यांच्या नेतृत्वात विधिमंडळावर काढलेला जनआक्रोश मोर्चा लक्षवेधी ठरला होता. यावेळीही मोर्चा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसची जोरात तयारी सुरू आहे. शरद पवार सहभागी होणार असल्याने राष्ट्रवादीने मोर्चासाठी पूर्ण ताकद लावली आहे. यवतमाळहून काढलेल्या हल्लाबोल दिंडीयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीची रंगीत तालिमही झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत.
पहिल्या दिवशी सत्ताधारीच आक्रमक
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ‘हल्लाबोल’ केला. शेतक-यांच्या कर्जमाफीवरून गोंधळ घालणा-या विरोधकांना ठणकावताना, शेतक-यांच्या आत्महत्या हे तुमचे पाप आहे, असे त्यांनी सुनावले. विरोधकांकडे दुर्लक्ष करीत सरकारने संपूर्ण कामकाजही उरकले. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीचा लाभ शेतकºयांना मिळाला नसल्याचे सांगत चर्चेची मागणी केली. ती नाकारून विधानसभाध्यक्षांनी कामकाज पुकारताच विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. त्यांनी कर्जमाफी फसवी असून दीड हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवला. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली.