श्याम नाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच शाळकरी विद्यार्थ्यांच्याही हाती ऑनलाइन वर्गामुळे स्मार्ट फोन आले. इंटरनेटचा वापर सर्वत्र वाढला आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर कार्यरत आहे. सोशल मीडियावर वावरताना दक्षता न बाळगता एखादी पोस्ट शेअर, लाइक किंवा फॉरवर्ड करणे अंगलट येऊन तुरुंगाची हवा खाण्याची वेळ येऊ शकते.
अलीकडे स्मार्ट फोन वापरताना व्हाॅट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा वापर करणे सहज शक्य आहे. अनेकजण सोशल मीडियाचा मनसोक्त वापर करतात. सोशल मीडियावर काही समाजभान नसलेले व विघ्नसंतोषी लोकांचाही मोठा भरणा आहे. ही मंडळी जहाल, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, शांतता भंग करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यावर भर देतात. काही आंबट शौकीन अश्लील, लैंगिक पोस्ट शेअर करतात. यातील एखादी पोस्ट तुम्ही चुकून शेअर, लाइक, फारवर्ड केली तर गुन्हा दाखल होऊन तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
..ही घ्या काळजी
- सोशल मीडियाच्या वापराने आपल्याला जगाशी जुळता येते; पण त्याचा अतिवापर करणे टाळावे.
- आपल्या व्हाॅट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आलेल्या मेसेजची खातरजमा करून घ्यावी. त्यानंतरच लाइक, शेअर किंवा फाॅरवर्ड करावे.
- शालेय विद्यार्थ्यांनाही सोशल मीडियाची क्रेझ वाढली आहे. पालकांनी त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
- शालेय, महाविद्यालयीन मुला-मुलींसह सर्वच नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर सांभाळून करण्याची गरज आहे.
हे अवश्य करा
- सोशल मीडियाचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग योग्य प्रकारे सेट करून नंतरच आपले फोटो व मेसेज शेअर केले पाहिजे.
- एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा पर्याय फेसबुक, व्हाॅट्सॲपवर उपलब्ध आहे.
- एखादी पोस्ट नको असल्यास ती काढून टाकली जाऊ शकते. मेसेज शेअर, लाइक व फाॅरवर्ड करताना आपण काही चुकीचे करीत नाही याचे भान ठेवले पाहिजे.
- धार्मिक भावना दुखवणाऱ्या, अश्लील पोस्ट शेअर, लाइक, फाॅरवर्ड करणे टाळावे.
- बनावट खात्यावरून मेसेज, पोस्ट येत नाही ना याची खातरजमा करावी.
- सोशल मीडियाचा वापर करताना मुलींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. डीपी प्रोफाइल लॉक करणे गरजेचे आहे. ते न केल्यास डीपीचा गैरवापरही होऊ शकतो.
-----
सोशल मीडियावर वावरताना धार्मिक भावना भडकविणाऱ्या, व्यक्तिगत बदनामी करणाऱ्या, अश्लील पोस्ट शेअर, लाइक किंवा फाॅरवर्ड करू नये. याबाबत तक्रार आल्यास आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. दोषी आढळल्यास सहा महिने ते तीन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
नागेश जाधव
उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल