लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून
खावी लागू शकते जेलची हवा !
दयानंद पाईकराव
नागपूर : आधुनिक काळात लहानमोठे सर्वच जण सोशल मीडियाचा वापर करतात. परंतु अनेकदा या सोशल मीडियाचा दुरुपयोग करण्यात येतो. काहीजण विनाकारण अश्लील मेसेज इतरांना पाठवितात. तर अनेकजण मुलींचे सोशल मिडियावर असलेल्या फोटोंचा दुरुपयोग करून त्यांना ब्लॅकमेल करतात. त्यामुळे लाईक, शेअर आणि फॉरवर्ड तसेच मुलींनी डीपी ठेवताना योग्य काळजी घेण्याची गरज आहे. जर कोणी सोशल मीडियाचा गैरवापर करीत असेल तर त्याचा जेलची हवा खावी लागू शकते. सायबर पोलीस अशा गुन्हेगारांचा छडा लावून त्यांना तुरुंगात पाठविण्यात यशस्वी होतात.
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
-अनेकदा आपसातील मतभेद आणि भांडण याचा बदला घेण्यासाठी बदनामी करण्याच्या हेतूने मुलीचे फोटो काढून त्यांचे अन्य खाते उघडण्यात येते. यावरून त्या फोटोचा वापर करून संबंधित मुली, महिलेचे फोटो एडिट करून तिची नग्न किंवा अर्धनग्न इमेज तयार करून बदनामी करण्यात येते. त्यामुळे सोशल मीडियाचा सांभाळून वापर करणे गरजेचे आहे.
मुलींनो डीपी सांभाळा
मुली अनेकदा आपले फोटो व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर ठेवतात. सायबर गुन्हेगार अशा वेळी तो फोटो कॉपी करून संबंधित मुलगी कॉलगर्ल आहे असे इतर मीडियावर भासवितात. इतर मीडियावर अर्धनग्न फोटो संबंधित मुलीला दाखवून तिच्याकडून पैसे उकळतात. त्यामुळे मुलींनी इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा इतर कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटवर संपूर्ण माहिती उघड करू नये. फेसबुक सहसा लॉक करून ठेवावे. डेटिंग ॲप सोशल मीडियाशी लिंक करू नये.
अशी घ्या काळजी
-सोशल मीडियावर आपली किंवा आपल्या कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती उघड करू नये. लहान मुले कोणत्या शाळेत शिकतात, कोणत्या ट्युशनमध्ये आहेत, हे सोशल मीडियावर टाकू नका. कारण गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन लहान मुलांचे अपहरण करू शकतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेण्याची गरज आहे.
सोशल मीडियावर बदनामी; २० जणांवर गुन्हे
सोशल मीडियावर बदनामी केल्यामुळे मागील तीन वर्षात नागपूर शहरात तब्बल २० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यात २०१९ मध्ये ७, २०२० मध्ये ९ आणि २०२१ मध्ये ४ गुन्हे दाखल झाले आहेत.
अकाऊंट लॉक करा
‘आपले फेसबुक अकाऊंट लॉक करून ठेवा. अनोळखी व्यक्तीला आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये सामील करून घेऊ नका. आपला फोटो वापरून गैरप्रकार होत असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा.’
-केशव वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, नागपूर
..........