नागपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. परंतु सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अद्यापही पोर्टलवर ऑनलाईन भरणे बाकी आहे. त्यामुळे १० जुलै व ११ जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व सामायिक सेवा केंद्र (सी.एस.सी सेंटर) व आपले सरकार सेवा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
उर्वरित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरता यावेत तसेच सदर योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व सामायिक सेवा केंद्र (सी.एस.सी सेंटर) व आपले सरकार सेवा केंद्र दोन्ही दिवस कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह निर्बंधाचे पालन करून सुरू ठेवण्यासाठी सूट देण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.