नागपूर : ‘रुट कॅनल’ उपचार सुरू असताना दाताला छिद्र पाडण्याची लहान तीक्ष्ण पीन चुकून रुग्णाच्या श्वासनलिकेत जाऊन अडकून पडली. रुग्णाला श्वास घेणे कठीण जात होते. रुग्णाची गंभीरता लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने तत्काळ विशेष उपचार सुरू केले व अर्ध्या तासातच शस्त्रक्रिया न करता ती पीन बाहेर काढण्यात यश मिळविले. त्या रुग्णाला जीवनदान मिळाले. एक ५० वर्षीय इसम २२ डिसेंबर रोजी ‘रुट कॅनल’ (दातांच्या नसावरील उपचार) करण्यासाठी दंत रुग्णालयात आले. उपचार सुरू असताना दाताला छिद्र पाडणारी लहान तीक्ष्ण ‘बर’नावाची पीन चुकून श्वासनलिकेतून उजव्या फुफ्फुसात जाऊन अडकली. रुग्णाला श्वास घेणे कठीण होऊ लागले होते. दाताच्या डॉक्टरांनी वेळ न घालविता धंतोली येथील गेटवेल हॉस्पीटलमध्ये रुग्णाला हलविले. तिथे उपस्थित हॉस्टीटलचे संचालक छातीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश स्वर्णकार, ब्राँकोस्कोपी व श्वसनविकार अतिदक्षता विभागाचे विशेषज्ञ डॉ. अनिल सोनटक्के व डॉ. दीपक मुठरेजा यांनी रुग्णाच्या गंभीरतेला ओळखले. डॉ. मुठरेजा व डॉ. सोनटक्के यांनी तत्काळ ब्राँकोस्कोपच्या मदतीने रुग्णाच्या श्वासवाहिन्यांची तपासणी केली. यात उजव्या फुफ्फुसाच्या खोलात तीक्ष्ण पीन अडकून असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी तत्काळ ती पीन बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. रुग्णाच्या श्वसननलिकेत ब्राँकोस्कोप टाकण्यात आला. एका दुसऱ्या यंत्राच्या मदतीने ती पीन पकडून घशापर्यंत आणली असता रुग्णाने अचानक हालचाल केली. यामुळे ती पीन निसटली आणि पोटात शिरली. यावेळी गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजीस्ट डॉ. अभिराम परांजपे यांना बोलविण्यात आले. त्यांनी गॅस्ट्रोस्कोपीच्यामदतीने ते यंत्र बाहेर काढले. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी वेळेवर घेतलेला निर्णय व डॉक्टरांच्या कुशलतेमुळे रुग्णाचा जीव वाचला.(प्रतिनिधी)
फुफ्फुसात अडकलेली तीक्ष्ण पीन काढली बाहेर
By admin | Published: December 28, 2016 3:33 AM