शत्रुघ्न सिन्हांनी काँग्रेस नेत्यांना सवाल करीत केले ‘खामोश’, म्हणाले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 11:37 AM2022-05-30T11:37:35+5:302022-05-30T11:42:41+5:30
काँग्रेस नेत्यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसने देशाच्या नवनिर्माणात दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.
नागपूर : हार्दिक पटेल, शत्रुघ्न सिन्हा अशा एका मागून एक लोक का काँग्रेसमधून जात आहेत, त्यांना का जाऊ दिले ? प्रत्येकजण काही राज्यसभेच्या खासदारकीसाठी गेलेला नाही. त्यांना मान, सन्मान, प्रेम मिळाले नसेल. दिलेला शब्द पाळला नसेल. मी पण व्यक्तिगत कारणांनी काँग्रेस सोडलेली नाही. पक्षातील काही लोक चुकीच्या हरकती करतात. दिलेला शब्द मोडतात, असे खडे बोल सुनावत तृणमूल काँग्रसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मंचावर उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांना खामोश केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा रविवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अ.भा. काँग्रेसचे सचिव आशीष दुआ यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांसमक्ष शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण काँग्रेस का सोडली, याची कारणमीमांसा मांडली.
सिन्हा म्हणाले, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबाबत माझ्या मनात आदर आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी माझे लोकसभेच्या तिकिटासाठी नाव दिले तेव्ही मी काँग्रेस सोडण्याबाबत संभ्रमात होतो. त्यावेळी अनेकांशी चर्चा केली. काँग्रेसमध्ये कुणाकडे आपली बाज मांडावी, आपले कोण ऐकून घेईल हा मूळ प्रश्न आहे. मी माझा फिडबॅक देत आहे, आपण तो योग्य जागी पोहचवावा, अशी अपेक्षाही त्यांनी आशीष दुआ यांच्याकडे व्यक्त केली. मी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलो; पण तत्त्वांसाठी जो पक्ष (भाजप) मी सोडला होता, त्या पक्षात गेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सद्य:स्थितीत देशाची व काळाची गरज लक्षात घेता विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेसच्या योगदानाची प्रशंसा
काँग्रेस नेत्यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसने देशाच्या नवनिर्माणात दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. हा महात्मा गांधी, नेहरू, इंदिराजींचा पक्ष आहे. आज देशात जेवढी महागाई, बेरोजगारी वाढलेली दिसते तेवढी काँग्रेसच्या काळात नव्हती, असेही त्यांनी सांगितले.