आशिष साैदागर
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काेराेना संक्रमण आणि टाळेबंदीचा फटका इतर उद्याेग व व्यावसायिकांसाेबतच ग्रामीण भागातील सलून व्यावसायिकांनाही बसला आहे. राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल केली असली तरी रविवारी संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय कायम आहे. या निर्णयामुळे आर्थिक नुकसान हाेत असल्याच्या प्रतिक्रिया सलून व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत तर दुसरीकडे एकाचवेळी दाढी व कटिंग करावयाची झाल्यास तब्बल ११० रुपये माेजावे लागत असल्याची माहिती सामान्य नागरिकांनी दिली.
पहिल्या टाळेबंदी काळात संपूर्ण दुकाने, उद्याेग व व्यापारी प्रतिष्ठाने बंद हाेती. त्यामुळे या टाळेबंदीचा फटका सर्वांनाच बसला. दुसऱ्या टाळेबंदी काळात बहुतांश नियम शिथिल करण्यात आले. इतर दुकानांसाेबतच सलूनची दुकानेही सुरू झाली. मात्र, सलून व्यावसायिकांनी दाढी व कटिंगचे दर पूर्वीपेक्षा वाढविले आहेत. बहुतांश नागरिक रविवारी सलूनमध्ये जाण्यास प्राधान्य देत असल्याने रविवारी सलून व्यावसायिकांना इतर दिवसांच्या तुलनेत चांगली मिळकत मिळायची. परंतु, शासनाने रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवल्याने सलून व्यावसायिकांचा हिरमाेड झाला आहे.
कडकडीत टाळेबंदी काळात सलून व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला हाेता. व्यावसायिकांना त्यांच्या दुकानाचा किराया देणे, दुकानातील विजेची बिले भरणे, जीवनावश्यक गरजा व घरखर्च भागविणे कठीण झाले हाेते. आर्थिक अडचणी असह्य हाेत असल्याने मध्यंतरी दुकाने सुरू करण्याची तसेच शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणीही सलून व्यावसायिकांनी रेटून धरली हाेती. आता रविवार बंदचा अडसर कायम असल्याने पेच निर्माण झाला आहे.
३५ रुपयांनी वाढ
पूर्वी दाढी व कटिंग करायची झाल्यास ७५ रुपये द्यावे लागायचे. आता मात्र यात ३५ रुपयांनी वाढ झाली असून, ११० रुपये माेजावे लागतात, अशी माहिती ग्राहकांनी दिली असून, याला सलून व्यावसायिकांनी दुजाेरा दिला आहे. दर वाढविले असले तरी ग्राहक दुकानात येण्याचे प्रमाण घटले आहे. ग्राहक दाढी व कटिंग व्यतिरिक्त मसाज, फेशिअल व अन्य बाबी करीत नसल्याने उत्पन्न घटल्याचे सलून व्यावसायिकांनी सांगितले.
काेराेना काळ हा आयुष्यातील सर्वात वाईट व कठीण काळ हाेता. या काळात शासनाने काेणतीही मदत केली नाही. रविवार सुटीचा दिवस असल्याने ग्राहक दुकानात यायचे. शासनाने रविवार बंदचे आदेश दिल्याने माेठी अडचण झाली आहे.
- चक्रधर साखरकर,
सलून व्यावसायिक, कळमेश्वर.
८५० जणांचे उपजीविकेचे साधन
कळमेश्वर तालुक्यात १६५ सलून दुकाने असून, ८५० जणांच्या कुटुंबीयांची उपजीविका ही सलून व्यवसायावर अवलंबून आहे. टाळेबंदीमुळे या प्रत्येक व्यावसायिकाचे माेठे आर्थिक नुकसान झाले आहे. टाळेबंदी काळात यातील २० टक्के व्यावसायिकांनी त्यांचा परंपरागत व्यवसाय साेडून इतर व्यवसाय करायला सुरुवात केली आहे.