बघेलवर गुन्हा दाखल, तूर्तास अटक नाही : पोलिसांची चौकशी सुरू नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर शनिवारी हसनबागच्या सभेत शाई फेकणारा ललित बघेल हा मोहरा असून, या प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसमधीलच दुसरा एक नेता असल्याची चर्चा आहे. पोलिसांनाही याचे धागेदोरे गवसले असून ठोस पुरावा हाती नसल्यामुळे कारवाई थांबली आहे. दरम्यान, पोलिसांनी बघेल विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असला तरी उपचार सुरू असल्यामुळे त्याला अद्याप अटक झालेली नाही. महापालिकेच्या निवडणुकीसाठी हसनबाग येथे शनिवारी रात्री आयोजित काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार सभेत माथाडी कामगारांचा नेता व काँग्रेस कार्यकर्ता ललित बघेल मंचावर आला. कुणाला काही कळायच्या आतच बघेलने खिशातून एक बॉटल काढत अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकली. मंचावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शाई फेकणाऱ्या बघेलला पडकले आणि बेदम चोप दिला. या प्रकारामुळे सभेत एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तावडीतून बघेलला कसेबसे सोडवून सभास्थळापासून दूर नेले. नंतर त्याला सक्करदऱ्यातील एका खासगी इस्पितळात दाखल केले होते. या प्रकरणात काँग्रेसच्या सीमा आशिष ढोक यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी ललित बघेल, गोलू गुप्ता, प्रवीण पोटे, विजय तेलंग यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १३५ भादंवि तसेच कलम ३५५ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी ललित बघेल याची प्रकृती बरी नसल्यामुळे पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही. दरम्यान, या प्रकरणाचा सूत्रधार कोण, त्याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. पोलीसही ललित बघेलला समोर करून कुणी हे कृत्य करून घेतले का, त्याचीही चौकशी करीत आहेत. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसमधीलच असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. मात्र, ठोस पुरावे नसल्याने याबाबत कुणी काही बोलायला तयार नाही. (प्रतिनिधी) ठाकरे, वंजारीविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दुसरा गुन्हा आचारसंहिता भंग केल्याबद्दल (कलम १६० भादंवि) दाखल केला. सरकारतर्फे सहायक निरीक्षक काचोरे यांनी तक्रार नोंदवून आरोपी ललित बघेल, गोलू गुप्ता, प्रवीण पोटे, विजय तेलंग यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, विजय चिकटे, तानाजी वनवे, प्रशांत बनकर, नौशाद अली, मुजीब वारसी आणि राजेश कनोजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. काँग्रेसजन संतप्त ‘त्याला’पक्षातून हाकला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर भरसभेत अशाप्रकारे शाई फेकण्यात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. बघेलची सविस्तर चौकशी व्हावी, या मागील सूत्रधाराचे नाव समोर यावे. सूत्रधार पक्षातील असल्याचे आढळून आले तर संबंधिताची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. सभांना कार्यकर्त्यांचे सुरक्षा कचव या घटनेपासून धडा येत काँग्रेसने आता पुढील सभांना आपल्या कार्यकर्त्यांचे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. याची जबाबदारी काँग्रेसच्या सामाजिक सुरक्षा सेलवर सोपविण्यात आली आहे. मंचाच्या समोर काँग्रेसचे ठाराविक कार्यकर्ते तैनात राहतील. ते मंचाच्या दिशेने येणाऱ्याला लांबच थांबवतील. त्याची विचारपूस करतील. नेत्यांनी मंचावरून हिरवी झेंडी दिली तरच संबंधिताला मंचावर जाऊ दिले जाईल.
‘शाईफेक’चा सूत्रधार काँग्रेसमधील?
By admin | Published: February 13, 2017 2:26 AM