लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावली परिसरातून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पोलिसांनी बनारसच्या एका गावातून सुखरूप परत आणले आहे. परंतु ती वारंवार घरातून निघून जात असल्यामुळे तिची आई त्रस्त झाली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करून तिच्या राहण्याची व्यवस्था शासकीय विद्यार्थिगृहात केली आहे.
बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी २०१९ मध्ये भंडारा, जानेवारी आणि जुलै २०२० मध्ये इंदूर आणि प्रयागराजमध्ये नृत्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घर सोडून गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली, वैशालीनगर येथील रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी आपली बहीण आणि आईसोबत राहते. तिला नृत्य करण्याची आवड आहे. त्यामुळे ती नेहमीच नृत्य स्पर्धात भाग घेण्यासाठी घरून निघून जाते. ४ फेब्रुवारीला ती दुपारी २ वाजता घरातून निघून गेली. तिच्या आईच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर या अल्पवयीन मुलीने आईला मोबाईलवरून आपण बाहेरगावी असल्याची सूचना दिली. पोलिसांनी तिच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ती उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. ठाणेदार किशोर नगराळे यांनी उत्तरप्रदेशला पथक रवाना केले. परंतु दरम्यान या अल्पवयीन मुलीने मोबाईलचे सीमकार्ड तोडून फेकले होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने महामलपूर, भैैसा गाव, केवटा बीर, नाईपुरा आणि कछवात तिचा फोटो स्थानिक नागरिकांना दाखवून तिचा शोध घेतला. दरम्यान, बनारसच्या कछवा येथे आयोजित एका नृत्य स्पर्धेत ती सहभागी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अखेर ती सुखरूप आढळली
ठाणेदार किशोर नगराळे यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलगी नेहमीच नृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी घरातून निघून जाते. ४ फेब्रुवारीला ती घरातून निघून सीताबर्डीतील आभा ट्रॅव्हल्सच्या बसने बनारसला पोहोचली. यापूर्वीही ती बनारसच्या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. ती कछवा येथील नृत्याच्या कार्यक्रमात आढळली. तिची वैद्यकीय तपासणी केली आहे. ती सुखरूप असल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
..........