सुमेध वाघमारे
नागपूर : तिची घरची परिस्थिती हलाखीची. मुलगी तीन वर्षांची झाली तेव्हा घराला आपलाही हातभार लागावा म्हणून तिने ड्रायव्हिंग शिकले. सोबतच बीएपर्यंत शिक्षणही घेतले. ड्रायव्हरची जागा निघत असे, अन् ती पासही व्हायची; परंतु महिला चालक म्हणून तिला डावलले जायचे. मात्र, तिने हिंमत सोडली नाही. अखेर २०१९ मध्ये आरोग्य विभागाच्या चालक पदासाठी जागा निघाल्या. त्यात निवड झालेल्यापैकी ती एकमेव महिला होती. जिद्दीच्या जोरावर ‘ती’ पहिली रुग्णवाहिका चालक झाली.
लाखनी तालुका, भंडारा जिल्हा येथील रहिवासी असलेली विषया लोणारे-नागदिवे त्या चालक महिलेचे नाव. विषयाला लहानपणापासूनच ड्रायव्हिंगचे वेड होते. यामुळेच दुसऱ्या वर्गात असताना ती सायकल चालवायला शिकली. चौथ्या वर्गात असताना लूना चालवायला लागली. विषया दहावीत असताना तिचे लग्न लावून दिले. पती दीपक मजूर म्हणून कामाला होते. पहिली मुलगी झाल्यानंतर तिचे घर आर्थिक अडचणीत सापडले. यातून बाहेर येण्यासाठी तिने शिक्षणाचा मार्ग निवडला. सोबतच २००३मध्ये महात्मा ज्योतिबा फुले मोफत ड्रायव्हिंग योजनेतून प्रशिक्षण प्राप्त केले. यादरम्यान तिने दुसऱ्यांच्या घरात स्वयंपाकाची कामे केली. २०१४ ते २०१७ या कालावधीत महावीज निर्मिती कंपनी भुसावळ व राज्य एसटी महामंडळात चालक या पदासाठी जागा निघाल्या. निवडही झाली; परंतु स्त्री आहे म्हणून नोकरी नाकारली. त्यावेळी तिला वडिलांनी साथ दिली. त्यांनी आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. म्हणूनच २०१९ मध्ये एसटी महामंडळाच्या पुन्हा निघालेल्या चालक पदासाठी तिने पुन्हा अर्ज केला. त्यात निवड झाली. अमरावती येथे सात ते आठ महिने ट्रेनिंगवर होती. याचवेळी आरोग्य विभागात चालक पदासाठी अर्ज केला. त्यातही निवड झाली. त्यात १४ पैकी ती एकमेव महिला होती. एसटीचे ट्रेनिंग सोडून आरोग्य विभागात रुजू झाली. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी तिच्याकडे डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णवाहिकेची जबाबदारी देण्यात आली.
-संघर्षामुळेच माणूस घडतो यावर विश्वास
‘लोकमत’शी बोलताना विषया म्हणाली, ‘इथपर्यंत येण्यासाठी मी खूप संघर्ष केला. संघर्षामुळेच माणूस घडतो यावर माझा विश्वास आहे. त्याचमुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकली. यात वडील, मुली आणि कुटुंबीयांची मदत झाली. स्वत:च्या कष्टाच्या कमाईत नक्कीच आनंद असतो. तो मी आज अनुभवत आहे.’
-विषयाने आपल्या परिश्रमाच्या बळावर यश काबीज केले
स्त्री रुग्णालयातील रुग्णवाहिकेत स्त्री चालकच असावी, असा काही नियम नाही; परंतु स्त्री चालक असल्याने तिची महिला रुग्णाला मदत होत आहे. विषया ही चांगली चालक आहे. तिने आपल्या परिश्रमाच्या बळावर हे यश काबीज केले आहे.
-डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधीक्षक डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय