अलिकडे विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण फार वाढल्याची ओरड केली जाते. ती खरीही आहे. पोलिसांकडे तक्रारीच्या रुपात येणाऱ्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कानावर येणाऱ्या प्रकरणातून विवाह्यबाह्य संबंध वाढल्याची प्रचिती येते. या संबंधात सर्वच बाजूने पुरुषांना दोषी ठरविले जाते. संबंध ठेवणारी महिला बहुतांश प्रकरणात मासळीसारखी सटकून बाहेर पडते. गेल्या महिनाभरात (अन् त्यापूर्वीदेखिल।) वेगवेगळ्या ठाण्यात दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणात विवाहबाह्य संबंधांचे वेगवेगळे पैलू उघड झाले. विशेष म्हणजे, संबंध ठेवण्यासाठी हट्ट मांडणारी स्त्री संबंध उघड होताच कशी बदलली, तेसुद्धा पोलिसांच्या नजरेत आले. नवऱ्याने रंगेहात पकडले म्हणून तिने बलात्काराचा कांगावा केला. तिच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे तिच्याशी संबंध ठेवणाऱ्याला मात्र गजाआड व्हावे लागले. अनेक प्रकरणात असे होते अन् बलात्कारासारखा आरोप लागल्यामुळे ‘तो’ सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो. अशातीलच काही दिवसांपूर्वी यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीत घडलेले एक प्रकरण पोलिसांसकट सर्वांनाच डोक्यावर हात मारून घेण्यास बाध्य करणारे ठरले. नवऱ्याने रंगेहात पकडले म्हणून तिने प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप लावला. पोलिसांनी त्याला अटक करून कोठडीत डांबल्यानंतर मात्र तिचे प्रेम जागे झाले. नवऱ्याचा विरोध झुगारून तिने तिचा प्रियकर निर्दोष असल्याचे सांगत त्याच्या जामिनासाठीही प्रयत्न केले. बोला आत्ता...।
ती बदलली, तो उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:09 AM