हरितगृहाचे वादळ ग्राहक मंचात : लताच्या संघर्षाचा विजयजितेंद्र ढवळे नागपूरजगावेगळे काहीतरी करण्याचा ‘तिचा’ संकल्प होता. यासाठी ‘तिने’ हरितगृह उभारले. यासाठी बॅँकेचे कर्ज घेतले. मात्र निसर्गाने लताच्या स्वप्नावर पाणी फेरले. कर्जाचा डोंगर समोर असताना विमा कंपनीने दावा नाकारला. बँकेनेही हात वर केले. पण लताचा यात दोष नव्हता. तिची फसवणूक झाली होती. पण ती खचली नाही. न्यायासाठी तिने हरितगृहाचा वादळी संघर्षाचा प्रवास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे पोहोचविला. मंचानेही लताचा संघर्ष आणि तिने सादर केलेले पुरावे विचारात घेता प्रतिवादी बँकेला दंड ठोठावत लताला ९ टक्के व्याजासह नुकसानभरपाईचे आदेश दिले. जागतिक महिला दिनाच्या पर्वावर लता या संघर्षाला सलाम! प्रकरण असे की, लता कट्यारमल यांनी महाराष्ट्र हॉर्टिकल्चर अॅण्ड मेडिसिनल प्लँट मंडळाच्या योजनेंतर्गत हरितगृह उभारण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या धरमपेठ शाखेकडून ९ लाख रुपयांचे कर्ज घेतले. यासोबचत स्वत:जवळीतील काही रक्कम टाकून मौजा आमगाव (हिंगणा) येथील शेतजमिनीवर हरितगृहाची उभारणी केली. या कर्जाच्या सुरक्षेसाठी तिने आयडीबीआय बँकेकडे शेतजमिनीचे गहाणखत करून दिले. यानंतर बँकेने कर्जाच्या सुरक्षेसाठी लता यांच्याकडून ४ हजार घेत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून आॅक्टोबर २०१२ मध्ये विमा काढून घेतला. मात्र या विम्याची सविस्तर माहिती लता यांना बँकेकडून पुरविण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी याचिकेतून केला आहे. बँकेने केली लताची दिशाभूल नागपूर : बँकेने त्यांना विम्याची प्रतही दिली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. १७ मे २०१३ रोजी हिंगणा परिसरात झालेल्या वादळाचा फटका लता यांच्या हरिगृहालाही बसला. यात त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पण विमा काढल्याने भरपाई मिळेल या आशेने लता यांनी बँकेच्या व्यवस्थापकाला वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली. यानंतर बँकेने नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे दावा सादर करण्यास सांगितले. बँकेच्या सांगण्यानुसार लता यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे नागपूर विभागीय कार्यालय गाठले. पण तिथे त्यांना कळले की आपली फसवणूक झाली आहे. यानंतर लता यांनी कृषी विभागाच्या अहवालाचा आधार घेत विमा कंपनीकडे हरितगृहाच्या नुकसानाबाबत लेखी कळविले. यावर विमा कंपनीने त्यांना नुकसानभरपाई दाव्याचा अर्ज दिला. यानंतर कंपनीचे सर्वेयर संतोष कुळकर्णी यांनी क्षतिग्रस्त हरितगृहाची पाहणी करीत नुकसानाचे मूल्यमापन केले. इतका खटाटोप केल्यानंतर विमा कंपनीने त्यांचा दावा फेटाळून लावला. यात विमा कंपनीने लता यांनी काढलेला विम्यात वादळ अथवा गारपिटीने नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळेल असा विमा त्यांनी काढलेला नव्हता. बँकेनेही त्यांना विमा काढताना यासंदर्भात अवगतही केले नव्हते. शेवटी लता यांना बँकेकडून दिशाभूल झाल्याचे लक्षात आले.
ती लढली, ती जिंकलीही ...
By admin | Published: March 09, 2016 3:18 AM