नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वॉर्डात प्रवेश करीत नाही तोच तिला प्रसवकळा आल्या. डॉक्टर, परिचारिकांनी प्रसंगावधान राखून जमिनीवरच प्रसूती केली. तिने मृत बाळाला जन्म दिला. परंतु नातेवाईकांनी याचा व्हिडिओ तयार करून यात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने मृत बाळ जन्माला आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली, तर प्रसूती सुरू असताना व्हिडिओ काढत अडथळा आणला म्हणून रुग्णालयाच्यावतीनेही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
प्रसूती झालेल्या महिलेचे नाव राणी वासनिक आहे. ती वाडी येथे राहते. तिच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार, राणी काही दिवसांपूर्वी कन्हान येथील आपल्या माहेरी आली. तिच्यावर एका खासगी हॉस्पिटलसोबतच डागा रुग्णालयातून उपचार सुरू होते. रविवारी सकाळी राणीला दुखणे सुरू झाले. सायंकाळी ७ वाजता एका खासगी डॉक्टरला तिला दाखविण्यात आले. त्यांनी कामठी येथील रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. कामठी रुग्णालयाने डागा रुग्णालयाचे कार्ड पाहून तिला तत्काळ डागामध्ये जाण्यास सांगितले. रात्री सुमारे १० वाजता डागा रुग्णालयात पोहचल्यावर तिथे डॉक्टर नव्हते. भरती करण्याची विनंती केल्यावरही कोणीच लक्ष दिले नाही. राणी वेदनेने तडफडत होती. शेवटी रुग्णालयाच्या प्रतीक्षालयातच मूल बाहेर आले. हे पाहून परिचारिका व महिला कर्मचाऱ्यांना जाग आली. त्यांनी प्रसूती केली, परंतु तोपर्यंत नवजात शिशूचा मृत्यू झाला होता. नंतर राणीला वॉर्डात भरती केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे राणीला भयानक त्रासाला, यातूनच मृत बाळ जन्माला आल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात केली.
-हलगर्जीपणा झाला नाही
डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता पारवे यांनी सांगितले, ही महिला रात्री रुग्णालयात येताच ती स्वच्छतागृहात दोनदा गेली. दुसऱ्यांदा आली तेव्हा तिला प्रसवकळा सुरू झाल्या होत्या आणि वॉर्डातच ती खाली बसली. डॉक्टर, परिचारिकांनी प्रसंगावधान राखून जमिनीवरच प्रसूती केली. बाळ मृत जन्माला आले होते. परंतु या दरम्यान ७ ते ८ नातेवाईक वॉर्डात घुसून व्हिडिओ काढत होते. तिचे बाळ अपुऱ्या दिवसाचे होते. तिने रुग्णालयात येण्यास बराच उशीर केला होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याने त्यांच्या विरोधात परिचारिका व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयाकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही.