लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बकरी पाळायची आणि गरजेच्या वेळी विकायची एवढाच समज ग्रामीण भागात आहे. पण बकरीच्या निरुपयोगी घटकापासून उद्योगाला चालना मिळू शकते, हे दाखवून दिले यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी. जिल्ह्यातील सात हजारावर महिलांना बकरीपासून नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. बकरीच्या दुधापासून तयार केलेले साबण, खत आणि इतर साहित्याच्या विक्रीचा स्टॉल नागपुरात सुरू असलेल्या महालक्ष्मी सरसमध्ये आहे.विदर्भ पशु संशोधन उन्नती केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या अर्थकारणाला बळ मिळू लागले आहे. शासनाच्या ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडातून आर्थिक मदत झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ७०० महिला बचत गटांना बकरी पालनासाठी निधी उपलब्ध करून दिला. या बचत गटांना विदर्भ पशु संसाधन उन्नती केंद्राच्या माध्यमातून जोडण्यात आले. प्रत्येक तालुक्यात बचत गटांतील महिलांपैकीच ६० पशुसखी तयार करण्यात आल्या. या पशुसखींना बकरीवर प्राथमिक उपचारासह साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. पशुसखी बचत गटांकडून बकरीचे दूध व लेंड्या खरेदी करतात. बाबुळगाव तालुक्यातील केंद्रावर पशुसखींनी गोळा केलेल्या साहित्यावर प्रक्रिया करण्यात येते. त्यापासून खत, साबण, हॅण्डवॉश, पशुखाद्य तयार करण्यात येते. या साहित्याच्या पॅकेजिंगपासून मार्केटिंगपर्यंतचे काम या पशुसखी करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेल्या चर्चेत यवतमाळच्या महिला बचत गटांनी बकरीच्या दुधापासून तयार करण्यात येत असलेल्या साबणासंदर्भात माहिती दिली असता ते अवाक झाले. त्यांनी बचत गटांना भेटण्याचे आमंत्रणसुद्धा दिले. कुठल्याही रसायनाचा वापर न करता तयार केलेले हे साबण आरोग्यवर्धक असल्याचा दावा महिलांनी केला आहे.
शेतावर मजुरी, घरोघरी भांडे घासणाऱ्या महिलांना मिळाला रोजगारगुरुमाऊली महिला बचत गट धापेवाडा येथील माला कोहाड यांनी ग्रामीण भागातील महिलांना उद्योगाची वाटचाल दाखविली आहे. ज्या महिला भांडे घासायच्या, शेतकाम करायच्या अशा महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले आहे. २७ बचत गटांच्या माध्यमातून २७० महिला या पुरुषांचे शर्ट शिवण्याचे काम गेल्या ४ वर्षापासून करीत आहे. या कामापासून महिलांना किमान ७ ते ८ हजार रुपये महिन्याला मिळकत आहे. महिला बचत गटांनी पारंपरिक साहित्य बनविण्यापेक्षा नाविन्यपूर्ण साहित्याची निर्मिती केल्यास त्यांना देशाच्या राजधानीत पोहचण्याची संधी आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे सरस पोर्टल तयार करण्यात येत आहे. यावर नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करणाºया बचत गटांच्या वस्तूंचा समावेश करण्यात येणार आहे. शिवाय दिल्ली येथे सरस गॅलरी तयार करण्यात आली आहे. तिथे सुद्धा असे महिला बचत गट आपल्या वस्तू विक्री करू शकतात.एच.आर. मीना, अवर सचिव, ग्रा.वि. मंत्रालय, केंद्र सरकार