नागपूर : इस जिंदगी का मै तलबगार तो नही, ऐ मौत ठहर जा...ऐ मौत ठहर जा... अभी तैयार मैं नही!...काळ, मृत्यू खूपच क्रूर असतो. कुणाच्या कितीही अडचणी असू दे, कुणी त्याच्यासमोर कितीही आर्जव करू दे, तो ऐकत नाही. गरिबीच्या दाहकतेचे चटके भोगणाऱ्या आणि बायको-मुलांच्या विरहाने कासाविस होऊन आपल्या गावाकडे निघालेल्या एका मजुरानेही उपरोक्त दोन ओळीच्या आशयातून मृत्यूला साद घालण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र मृत्यूने त्याला दाद दिली नाही. या मजुरावर रस्त्यातच झडप घातली. काळाचा सूड त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांनीही अनुभवला. काळजाला चिरे पडावे, अशी ही कर्मकथा रामसेवक भूईया (वय ३८) या बिहारातील मजूर आणि त्याच्या कुटुंबासंबंधाची आहे.
औरंगाबाद (बिहार) जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात रामसेवक राहत होता. पत्नी बसंतीने त्याचा संसार फुलवला. त्यांना पाच मुले आहेत. गावात वर्षातील काही दिवसच हाताला काम, तेही रात्रंदिवस कष्ट करून धड दोन वेळेची चुल पेटविण्यास पुरेसे नव्हते. चेन्नई, कर्नाटकमध्ये खूप काम आणि चांगले पैसे मिळते, असे रामसेवकने कुणाकडून तरी ऐकले. त्यामुळे काळजाचे तुकडे आणि पत्नीला गावात ठेवून २ हजार किलोमिटर दूर कर्नाटकमध्ये पोहचला. तेथे मिळेल ते कष्ट करून स्वत:चे पोट भरायचे अन् जागा मिळेल तेथे झोपायचे, असे त्याचे सुरू झाले. मात्र, बरेच दिवस कबाडकष्ट करून तेथेही गाठी पैसे पडत नव्हते.
पत्नी आणि मुलांच्या विरहात जीवही कासाविस होत होता. त्यामुळे रामसेवकने गेल्या आठवड्यात आपल्या गावात पोहचण्यासाठी रेल्वे तिकिटाचे जेवढे भाडे आहे, त्याची सोय केली अन् बायको-मुलांत पोहचण्यासाठी बुधवारी बेंगळुरू दानापूर संघमित्रा एक्सप्रेसमध्ये बसला. त्याच्या जवळ ना बॅग होती ना, खिशात पैसा. अंगावरच्या कपड्यांसह बायको-मुलांच्या ओढीने त्याने गावाकडचा प्रवास सुरू केला. ११८० किलोमिटरचे अंतर पूर्ण करून गुरुवारी सकाळी ट्रेन नागपुरात पोहचली.
येथे प्रवाशांनी तक्रार केल्याने आरपीएफ आणि जीआरपीने ट्रेनच्या टॉयलेटचा दरवाजा उघडला. आतमध्ये रामसेवक मृतावस्थेत आढळला. त्याच्या कपड्याच्या खिशात आढळलेल्या तिकिट आणि आधारकार्डमुळे त्याची ओळख पटली अन् रेल्वे पोलिसांनी लगेच बिहार पोलिसांच्या माध्यमातून रामसेवकच्या गावातील मुखियाशी संपर्क केला. त्यांना रामसेवकचा मृत्यू झाल्याचे सांगून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबियांना नागपुरात येण्याची सूचना केली.
रामसेवकचे कुटुंबीय अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करणारे. त्यामुळे एवढे अंतर कापण्यासाठी ते कुठून पैसे आणणार, असा प्रश्न उपस्थित झाला. ठाणेदार मनिषा काशिद यांनी पोलिसांमार्फत त्यांना कळविले की 'त्यांना तेथून रेल्वेने नागपुरात पाठविण्याची व्यवस्था तुम्ही करा, ईकडून गावात पाठविण्याची व्यवस्था आम्ही करतो'. हा आधार मिळाला अन् रामेसवकची पत्नी बसंती, छोटा मुलगा आणि जवळचे नातेवाईक असे पाच जण रविवारी नागपुरात पोहचले. रामसेवकचा मृतदेह पाहून पत्नी धायमोकलून रडली.
कळण्या-समजण्याचे वय नसल्याने मुलगा कावराबावरा झाला. मृतदेह गावात न्यायचा म्हटले तर ३० ते ३५ हजार रुपये खर्च येणार होता. जीवंतपणी पै-पैशासाठी रक्ताचा घाम करणाऱ्या रामसेवकला हजाराचा आकडाच कळला नाही. त्याच्या भाबड्या पत्नीने तर तीस पस्तीस हजारांची कल्पनाच केली नसावी. त्यामुळे रामसेवकवर येथेच अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. त्यानुसार, रखरखत्या उन्हात अनवानी तगमग करत रामसेवकची पत्नी, नातेवाईक यांनी येथील गंगाबाई घाटावर रामसेवकवर अंत्यसंस्कार केले.
बसंतीचे रुदन हृदयातच गप्पजीवंतपणी रामसेवकने प्रचंड आर्थिक झळ सोसली. मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनीही आर्थिक परिस्थितीची दाहकता अनुभवली. चार पैसे घेऊन येईन, बायको मुलांना पोटभर खाऊ घालेन, ही आस बाळगून गावापासून दोन हजार किलोमिटर दूर गेलेल्या रामसेवकला तेथेही गरिबीने, पोटाच्या आगीने चटके दिले. ते असह्य झाल्याने त्याने गावाकडचा रस्ता धरला मात्र त्याचा प्रवास अर्ध्यावरच संपला. तो कायमचा थांबला. त्याच्या जाण्याने पत्नी बसंतीचे रुदन हृदयातच गप्प झाले.
अश्रू अन् भरलेल्या भावनारामसेवकचा मृतदेह ताब्यात घेण्यापासून तो त्याच्या पत्नी-मुलासह अन्य कुटुंबीयांना नागपुरात बोलवून रामसेवकवर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत अन् त्यांच्या खानपानासह खर्चासाठी आर्थिक मदत करून अत्यंत प्रशंसनीय काम रेल्वेच्या ठाणेदार मनीषा काशिद, एएसआय झुरमुरे, हवलदार नीलेश बारड, हवलदार पटले आणि ऋषी राखुंडे तसेच वाहन चालक संतोष महानंदीया यांनी केले. या सर्वांना मनोमन धन्यवाद देत सुकलेले अश्रू अन् भरलेल्या भावना सोबत घेत बसंती रामसेवकच्या अस्थी घेऊन गावाकडे निघाली.