सुमेध वाघमारे
नागपूर : पहाटे ५.३० ची वेळ. घरी शौचालय नसल्याने आई जंगलाकडे निघाली. मागेमागे पाच वर्षांची मुलगी होती. अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. ती आई म्हणून ओरडली. मागे वळून पाहताच वाघाच्या जबड्यात मुलीचे डोके पाहून ती घाबरली. परंतु हिंमत हरली नाही. जवळच पडलेली बांबूची काठी उचलून शेपटीवर वार केला. वाघाने मुलीला खाली ठेवत आईवर हल्ला केला. तिने काठीने हल्ला परतवून लावला. पुन्हा वाघाने मुलीला जबड्यात पकडताच आईने काठीने हल्ला चढवला. वाघाने मुलीला जबड्यातून खाली ठेवत आईवर झेप घेणार तोच तिने सर्व शक्ती एकवटून काठीने वाघावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्याने वाघ घाबरून पळून गेला.
वाघाच्या जबड्यातून मुलीला सुखरूप बाहेर काढणारी ती आई मुलीच्या चेहऱ्यावरील उपचारासाठी शुक्रवारी शासकीय दंत रुग्णालयात आली. त्यावेळी तिने डॉक्टरांना आपली आपबिती सांगितली, तेव्हा त्यांनीही तिच्या हिमतीला सलाम केला.
चंद्रपूर जिल्ह्यापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेले जुनोना गावातील ही घटना. अर्चना संदीप मेश्राम त्या धैर्यवान आईचे नाव. १ जुलै रोजी घडलेल्या या घटनेची माहिती देताना तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव होते. ती म्हणाली, वाघाच्या जबड्यात रक्ताने माखलेले मुलीचे डोके पाहून आतून थरथर कापत होते. परंतु कुठून हिंमत आली माहीत नाही, वाघाला पोरीचा घास होऊ द्यायचा नाही हे ठरवले. त्यामुळे हाताला बांबूची काठी लागताच त्याने हल्ला चढविला. दुसऱ्या वेळी जेव्हा मुलीला जबड्यातून खाली ठेवून तो हल्ला चढविणार तीच संधी साधली. मोठा आवाज करीत वाघावर हल्ला चढविला. ती शक्ती माझ्यात कुठून आली मलाही माहीत नाही. धिप्पाड वाघ जंगलात पळून जाताना पाहून मलाच माझे आश्चर्य वाटले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या मुलीला कुशीत घेऊन गावाकडे धावत सुटले. पतीच्या मदतीने लागलीच जिल्हा रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मुलगी धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच जीवात जीव आला.
-चेहऱ्याचे हाड अनेक ठिकाणी तुटलेले
चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात १५ दिवसाच्या उपचारानंतर तेथील डॉक्टरांनी नागपुरातील शासकीय दंत रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यास सांगितले. नागपूर गाठून शुक्रवारी त्या मुखशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर यांना भेटले. त्यांनी त्या माऊलीच्या हिमतीची दाद देत मुलीची तपासणी केली. ‘एक्स-रे’मध्ये चेहऱ्याचे हाड अनेक ठिकाणी तुटल्याचे दिसून आल्याने त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
-चेहऱ्याला पक्षाघात, एक डोळाही बंद होत नाही ()
वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे आदीसाठी करतो. मुलीचे डोके छोटे असल्याने वाघाचे वरच्या व खालच्या जबड्याचे सुळे मेंदूत शिरले नाही. मानेवर आणि डोळ्याच्या खाली रुतले. यामुळे मुलगी वाचली. परंतु चेहऱ्याचा वरचा जबडा अनेक ठिकाणी तुटला. चेहरा वाकडा होऊन ‘फेशियल पाल्सी’ म्हणजे, चेहऱ्याचा पक्षाघात झाला. मुलीचा उजवा डोळाही बंद होत नाही. मुलीला भरती करून उपचाराला सुरुवात केली आहे. सोमवारी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.
-डॉ. अभय एन. दातारकर
प्रमुख, मुखशल्यशास्त्र विभाग, शा. दंत रुग्णालय