लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिधोरा (ता. कुही) हे गाव ८५ वर्षांपूर्वी वसले असल्याची माहिती स्थानिक वयोवृद्ध नागरिक देत असून, तशी शासनदप्तरी नोंद आहे. मात्र, सदर गाव वसलेल्या जागेचा सातबारा आपल्या नावावर असून, संपूर्ण गाव अतिक्रमित आहे, असा दावा एका महिलेने केल्याने खळबळ उडाली आहे.रिधोरा गावाचा समावेश बानोर (ता. कुही) गटग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आला आहे. या गावात १० ते १२ घरे असून, येथील नागरिकांना बानोर गटग्रामपंचायत प्रशासनाने रस्ते, वीज, पाणी यासह अन्य नागरी सुविधा पुरविल्या आहेत. शिवाय, येथील नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाला मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कराचा भरणाही नियमित करतात. गाव वसलेल्या जागेवर आजवर कुणीही मालकी हक्क सांगितला नाही. मात्र, ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करीत बेबीनंदा ठाकरे, रा. नागपूर यांनी ग्रामस्थांना नोटीस बजावल्या आहेत.या गावालगत बेबीनंदा ठाकरे यांची शेती आहे. गाव वसलेली जागा ही स्थानिक स्वातंत्र्य संग्राम सेनानीने दान दिली होती. त्यामुळे ही जागा तेव्हापासून आजवर ग्रामपंचायतच्या ताब्यात असून, त्या जागेचा स्वतंत्र सातबारा असल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे. गावाची जागा आपल्या मालकीची असून, ती जागा खाली करून द्यावी, अशी सूचनाही बेबीनंदा ठाकरे यांनी नोटिशीद्वारे ग्रामस्थांना केली आहे.बेबीनंदा ठाकरे या ग्रामस्थांच्या साधेभोळेपणाचा फायदा घेत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे आपण गाव का खाली करायचे, असा प्रश्न ज्ञानेश्वर झलके, रेखा खराबे, राजू चौधरी, बंडू चौधरी, धोंडू चौधरी, पवन सहारे, मारोती भोयर, ज्ञानेश्वर चौधरी या ग्रामस्थांनी केला आहे.
'ती' म्हणते, हे अख्खे गाव माझ्या नावावर आहे.. ते रिकामे करून द्या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 10:34 AM
नागपूर जिल्ह्याती रिधोरा हे अवघे गाव आपल्या नावाने असल्याचा दावा तेथील एका महिलेने केला आहे.
ठळक मुद्देगावाचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर?