लोकमत न्यूज नेटवर्कशरद मिरेनागपूर : ‘हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माय!’ गोमातेच्या रूपात मायमाऊलीचे पोटच्या गोळ्यावरील आंतरिक प्रेमावर आधारित या गीताने अनेकांना रडवून सोडलं. यातून ‘सदरक्षणाय् खलनिग्रहाणाय्’ ब्रीदावर कार्य करणारी ‘खाकी’सुध्दा सुटली नाही. कत्तलीसाठी जाताना मातेपासून पासून दुरावलेली ‘ती’ पोलिसांच्या हाती लागली. वर्दीतील माणूसपण जागं झालं. पोलिसांनी तिला दूध पाजून जगवलं! अवघ्या सहा महिन्याची ‘ती’ आता गोमातेच्या रूपात पोलीस वसाहतीत फिरायची. घराघरात तिला मान, सन्मान मिळायचा. दोन दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली. डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होता. काल रात्री तर प्रकृती आणखीनच खालावली. पोलिसांनी रात्रभर जागून तिची सेवा केली. अखेरीस शनिवारी पोळ्याच्या पूर्वेला तिने अखेरचा श्वास घेतला. तिचा मृत्यू पोलीस दलाला चटका लावून गेला.गतवर्षी रक्षाबंधनाच्या पूर्वेसंध्येला राष्ट्रीय मार्गावर पेट्रोलिंग सुरू असताना भिवापूर पोलिसांनी कत्तलीसाठी जाणारे वाहन ताब्यात घेतले. त्यात जनावरांसोबत एक सहा महिन्याची कालवड अतिशय निर्दयतेने कोंबून होती. तिचा श्वास गुदमरला होता. तत्कालीन ठाणेदार रवींद्र दुबे यांनी कारवाई करीत वाहनातील सर्व जनावरे गोसेवा केंद्राच्या सुपूर्द केली. मात्र या सहा महिन्यांच्या देखण्या कालवडीवर त्यांचा जीव जडला आणि तिला पोलीस स्टेशनमध्येच ठेवून घेतले. पोलीस कर्मचारी नरेंद्र पटले हे या कालवडीचे सेवाकरी! त्यांनी विकतच्या दुधावर तिला जगविले. हळूहळू ही कालवड आता गोमाता झाली होती. गुन्हेगारांना धडकी भरणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये तिच्यावर ‘खाकी’चे प्रेम वाहू लागले. पोलीस वसाहतीत तिचे कौटुंबिक सदस्य म्हणून स्थान होते. त्यामुळे प्रत्येकाच्या घराची पायरी चढून ‘ती’ आपला हक्क गाजवायची. पोलीस कर्मचारी नरेंद्र पटले हे तिच्या सेवेत सदैव तत्पर! दोन दिवसांपूर्वी कदाचित तिला सर्पदंश झाला असावा, प्रकृती बिघडली! पशुवैद्यकीय विभागाकडून तिच्यावर उपचार सुरू होते. अशातच शुक्रवारी रात्री प्रकृती आणखीनच खालावली. पोलीस कर्मचारी नरेंद्र पटले व शेजारचा पाणटपरीचालक महेश डडमल या दोघांनी गोमातेची सेवा करत काल रात्र जागून काढली. मात्र शनिवारी पोळ्याच्या पूर्वेला तिने अखेरचा श्वास घेतला.