ती थंडीपासून बचाव करण्यासाठी मृतदेहाला कवटाळून झोपत होती..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 08:38 PM2023-07-14T20:38:34+5:302023-07-14T20:39:00+5:30
Nagpur News कठीण परिस्थितीमध्ये स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी कधी-कधी कसे कल्पनातीत व मानवी भावभावना विव्हळून जातील अशा पद्धतीने वागू शकतात, याचा एक थरारक अनुभव 'गूंज' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते अंशू गुप्ता यांनी येथे सांगितला.
नागपूर : देशातील हजारो व्यक्ती आजही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. असे व्यक्ती कठीण परिस्थितीमध्ये स्वत:ला जीवंत ठेवण्यासाठी कधी-कधी कसे कल्पनातीत व मानवी भावभावना विव्हळून जातील अशा पद्धतीने वागू शकतात, याचा एक थरारक अनुभव 'गूंज' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते अंशू गुप्ता यांनी शुक्रवारी नागपूर येथे सांगितला.
हा प्रसंग १९९९ मधील आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे हिवाळ्यामध्ये पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे दरवर्षी शेकडो बेघर नागरिकांचा मृत्यू होत होता. पोलिसांनी बेवारस नागरिकांचे मृतदेह गोळा करण्यासाठी क्षेत्रनिहाय मजूर नेमले होते. त्यांना एका मृतदेहासाठी २० रुपये दिले जात होते. दरम्यान, गुप्ता यांनी त्यापैकी एका मजुराची भेट घेतली. त्याच्याकडून बेघर नागरिकांच्या मृत्यूची कारणे माहिती करून घेताना त्याच्या मुलीने स्वत:संदर्भात हृदय हादरवून सोडणारा खुलासा केला. आवश्यक गरम कपडे नसल्यामुळे ती मुलगी रात्री कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बेवारस मृतदेहाला कवटाळून झोपत होती. या प्रसंगाने गुप्ता यांना आंतरबाह्य हलविले.
तेव्हापासून त्यांनी स्वत:चे जीवन गरजू व्यक्तींच्या उद्धारासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भक्कम पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून 'गूंज' या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था देशभरातील गरजूंना कपडे, घरगुती सामान, शैक्षणिक साहित्य आणि अन्नधान्य पुरविण्याचे कार्य करते.
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने गुप्ता यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या प्रसंगाची माहिती देऊन गरजू नागरिकांच्या कल्याणाकरिता सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. देशात अनेक मोठ्या समस्या आहेत आणि त्या समस्या दूर करण्याचे उपायदेखील आपल्याकडे आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादी गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु, या गरजा संबंधित व्यक्तीचा आत्मसन्मान जपून पूर्ण केल्या गेल्या पाहिजे. त्यामुळेच आम्ही गरजू व्यक्तींकडून त्यांच्या क्षेत्रातील समस्या दूर करण्याचे काम करून घेतो व त्यानंतर त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करतो. त्यामधून संबंधित व्यक्तींमध्ये त्यांची गरज स्वत:च्या परिश्रमातून पूर्ण झाली, हा आत्मसन्मानाचा भाव निर्माण होतो, असे गुप्ता यांनी सांगितले. संघटनेचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे व सचिव ॲड. अमोल जलतारे यांनी गुप्ता यांचे स्वागत केले तर, ॲड. अपूर्वा कोल्हे यांनी परिचय करून दिला.