नरेश डोंगरे नागपूर : पती पत्नीतील किरकोळ वादामुळे तिच्या मनात काहूर उठले. रोजच्या कटकटीमुळे ती अक्षरश: वैतागली अन् नकोच हा जीव म्हणत रामटेकहून नागपुरात पोहचली. रेल्वेखाली झोकून द्यायचे आणि एकदाचे सर्वच संपवायचे, या विचारात असताना तिचा फोन खणखणला. पलिकडून बोलणारा तिचा पती होता. आत्महत्या करायला अजनी रेल्वेस्थानकावर आल्याचे तिने त्याला एका झटक्यात सांगून टाकले. ते ऐकून तो हादरला अन् तिला आपल्या प्रेमाची, घरच्यांची आठवण करून देत तिला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले. ती बधत नव्हती. दूरून भोंगा वाजवत येणारी रेल्वेगाडी त्याच्या काळजाची धडधड वाढवत होती. अचानक त्याने तिला आपल्या काळजाच्या तुकड्यांची आण घातली. तू गेल्यानंतर त्यांचे कसे होईल, असा प्रश्न केला. या प्रश्नाने तिची ममता पाझरली अन् ...
घटना कमालीची हृदयस्पर्शी आहे. कमला आणि कमाल (काल्पनिक नावे) रामटेकजवळ राहतात. एकाच गावात, आजुबाजुला राहत असल्याने बालपणापासूनच त्यांची मैत्री. वयात आल्यानंतर ती प्रेमात रुपांतरीत झाली. दोघेही होतकरू, त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घरच्यांनी जातीचे कारण सांगून कडाडून विरोध केला. तो झिडकारून या दोघांनी ९ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यांना दोन गोंडस मुले (मुलगा-मुलगी) झाली. रोजगार अस्थिर असला तरी एकमेकांच्या प्रेमाच्या शिदोरीवर त्यांचे जीवनगाणे चांगले सुरू होते.
मात्र, कुणाची नजर लागली कळायला मार्ग नाही. दोघांच्याही मनात शंकांनी घर केले अन् सुरू झाल्या कटकटी. तो तिचेवर आणि ती त्याच्यावर संशय घेऊन भांडू लागले. दोन दिवसांपासून या वादाने टोक गाठले अन् तिच्या मनात विचारांचे काहूर उठले. प्रचंड तणावात आल्यामुळे काय चांगले, काय वाईट याचा विचार न करता तिने थेट आत्महत्या करण्याचाच निर्णय घेतला. ती नागपुरातील अजनी स्थानकावर पोहचली. तत्पूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिली. जगणे असह्य झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमूद केले. तत्पूर्वी पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून आत्महत्या करीत असल्याचेही सांगितले. आता गाडी आली की, तिच्यासमोर स्वत:ला झोकून द्यायचे, या विचाराने ती फलाटावर उभी होती.
दरम्यान, दुपारचे ४ वाजले, घरून गेलेली कमला अजून घरी परतली नसल्याने अस्वस्थ असलेल्या कमालच्या मनातही शंका-कुंशकांचे वादळ उठले. त्याने कमलाच्या मोबाईलवर संपर्क केला. तिने फोन उचलला. कुठे आहे, म्हणताच आत्महत्या करायला अजनी रेल्वेस्थानकावर आल्याचे तिने सांगितले. गाडीची वाट बघत आहे, असेही बोलून दाखविले. त्याने तिला स्वत:ची, आपल्या प्रेमाची शपथ दिली. तिच्या आईवडिलांची आण घातली. ती मात्र बधत नव्हती. तिचा दृढनिश्चय कमालच्या काळजाचे पाणी करत होता. अशात दूरवरून स्थानकात येऊ पाहणाऱ्या रेल्वेगाडीचा भोंगा वाजला अन् रडकुंडीला आलेल्या कमालने तिला आपल्या पोटच्या मुलांची शपथ दिली. तू गेल्यानंतर त्यांचे कसे होणार, असा प्रश्न केला अन् आतापर्यंत स्त्री हट्टाने पेटलेल्या कमलातील आई जागली. ती झटक्यात भानावर आली आणि तिने एकच हंबरडा फोडला. दरम्यान, कंट्रोलला कॉल गेल्याने धंतोलीचे पोलीस कर्मचारी रेल्वे स्थानकावर पोहचले. तोपर्यंत काही सजग रेल्वे प्रवाशांच्याही लक्षात हा प्रकार आला होता. त्यामुळे साऱ्यांनीच तिला मायेची उब देऊन रेल्वे पोलीस ठाण्यात पोहचवले.पती, आई, बहिण सारेच धावलेदरम्यान, पतीने कमलाच्या आई आणि बहिणीला माहिती दिल्यामुळे चिमुकल्यांसह ते एकत्रच रेल्वे पोलीस ठाण्यात पोहचले. ठाणेदार मनिषा काशिद यांनी कमलाच्या माहेरच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली. पती चांगला आहे, ही थोडी शिघ्रकोपी असल्याचे प्राथमिक चाैकशीतून पुढे आले. ठाणेदार काशिद यांनी कमलाचे समुपदेशन केले. तिच्या पतीलाही समजावून सांगितले. एकमेकांवर नाहक संशय घेत असल्यामुळे सुखी संसार दुखी झाल्याचेही लक्षात आणून दिले. दोघांनाही चूक उमगली अन् नंतर काळजांच्या तुकड्यांचा लाड करत त्यांनी आपल्या घराचा रस्ता धरला.