लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेने मसाज पार्लरच्या आड सुरू असलेला देहव्यापार उघडकीस आणला आहे. अड्ड्यावर छापा घालून अड्डाचालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई सक्करदरा ठाण्यांतर्गत उमरेड मार्गावर करण्यात आली. अड्डा चालक आणि पीडित तरुणी टाळेबंदीमुळे बेरोजगारीच्या संकटात सापडले होते. आर्थिक मिळकतीसाठी त्यांनी देहव्यापारास सुरुवात केली. महेश विठ्ठलराव पंधरे (३२), स्वप्निल बाबाराव वर्धे (२५) रा. तुकडोजी पुतळा तर पवन भाऊराव मोहरिया (२६) रा. चिटणीस नगर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. अड्ड्याचा प्रमुख महेश पंधरे आहे. तो पूर्वी लहानमोठी कामे करून गुजराण करत होता. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावात तो बेरोजगार झाला. उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने आणि मसाज पार्लरच्या धंद्याची माहिती असल्याने त्याने मसाज पार्लर सुरू केले. उमरेड मार्गावरील हर्षधन कॉम्पलेक्समध्ये ८ हजार रुपये भाड्याने त्याने फ्लॅट घेतला. येथे मसाज पार्लरच्या नावावर तो देह व्यापार करू लागला. या व्यापारामुळे त्याला अनेक ग्राहक सापडले. ग्राहकांना तो त्यांच्या व्हॉट्सॲपवर तरुणींचे फोटो पाठवून सौदा करत होता. यात स्वप्निल वर्धे महेशला मदत करत असे. याची माहिती पोलिसांना होताच, एसएसबीने डमी ग्राहकाला महेशकडे पाठवले. दोन हजारात तरुणीचा सौदा झाला आणि रक्कम घेऊन युवती उपलब्ध होताच एसएसबीने छापा मारला. यात महेशसह स्वप्निलला ग्राहक मोहरियासोबत पकडण्यात आले.
महेशच्या अड्ड्यावर मिळालेली ३७ वर्षीय तरुणी काडीमोड झालेली आहे. ती पूर्वी मॉलमध्ये कामाला होती. टाळेबंदीमुळे आठ महिन्यापासून मॉल बंद होता. त्यामुळे, उदरनिर्वाहाचा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला. महेश सोबत तिची जुनी ओळख असल्याने ती देहव्यापाराशी जोडल्या गेली. आरोपींविरुद्ध सक्करदार ठाण्यात अनैतिक व्यापार निरोधक कायद्यान्वये प्रकरण नोंदवण्यात आले आहे. ही कारवाई एसएसबीचे प्रभारी पीआय सार्थक नेहते व त्यांच्या टीमने केली.