नागपूर : वर्धा जिल्ह्यातील त्या निष्पाप गर्भवती अल्पवयीन मुलीला बलात्काराच्या भावनिक वेदनांपासून मुक्ती मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने शुक्रवारी त्या मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. त्यामुळे भविष्यामध्ये तिला मानसिक आघात करणाऱ्या बलात्काराच्या खूणा डोळ्यांपुढे दिसणार नाही.
न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व अभय मंत्री यांनी पीडित मुलीला दिलासा दिला. ही मुलगी १७ वर्षे वयाची असून तिला आरोपी परवेज खानने प्रेमाच्या जाळ्यात फसविले होते. दरम्यान, त्याने मार्च-२०२३ मध्ये मुलीला दोन-तीनदा लॉजवर नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. सध्या तिच्या गर्भात २६ आठवड्याचे बाळ आहे.
वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार विशिष्ट प्रकरणांत २४ आठवडे कालावधीपर्यंतचाच गर्भ पाडला जाऊ शकतो. इतर अपवादात्मक परिस्थितीत वैद्यकीय मंडळाने सकारात्मक अहवाल दिल्यास गर्भ पाडता येतो. त्यामुळे मुलीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गर्भपाताची परवानगी मागितली होती. मी बलात्कारामुळे गर्भवती झालेय. त्यामुळे मला कोणत्याही परिस्थितीत बाळाला जन्म द्यायचा नाही, अशी कैफियत तिने न्यायालयासमक्ष मांडली होती.
वैद्यकीय मंडळाचा अहवाल सकारात्मक
उच्च न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणावरील सुनावणीनंतर वर्धा नागरी रुग्णालय येथे वैद्यकीय मंडळ स्थापन करावे आणि या मंडळाने पीडित मुलीची तपासणी करून अहवाल द्यावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, वैद्यकीय मंडळाने न्यायालयात अहवाल सादर करून पीडित मुलीचा गर्भपात केला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले. करिता, न्यायालयाने मुलीची याचिका मंजूर केली. पीडित मुलीतर्फे ॲड. सोनिया गजभिये यांनी कामकाज पाहिले.