नागपूर : ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासोबतच स्वयंरोजगारासाठी बळ देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने ‘पशुसखी’ सक्षमीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत येत्या दोन वर्षांत १०५० महिलांना पशुपालन, तर ४७० महिलांना शेळी व कुक्कुट पालनाचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाईल.
या महिलांना पशुसखी अशी मान्यताही असेल. पशू संवर्धनाच्या माध्यमातून स्वत:चा स्वयंरोजगार उभा करणे व गावातील इतर महिलांना यासाठी मदत करणे, ही या पशुसखींची जबाबदारी असेल. यासंदर्भात मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि माफसू यांच्यात अलीकडेच सामंजस्य करार झाला.
४.१७ कोटी रुपयांच्या पशुसखी सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत माफूसअंतर्गत असलेल्या मुंबई, नागपूर, परभणी, उदगीर, शिरवळ व अकोला येथील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयांत येत्या दोन वर्षांत महिलांना प्रशिक्षण दिले जाईल. येत्या जुलै महिन्यापासून या प्रशिक्षणास सुरुवात होईल.
सांमजस्य करारावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, महाव्यवस्थापक (प्रकल्प) कुसुम बाळसराफ, महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) तथा प्रकल्प प्रमुख डॉ. अनिल भिकाने, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. सरिता गुळवणे, परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विस्तार विभाग प्रमुख डॉ. धनजंय देशमुख, प्रकल्प सहसमन्वयक डॉ. संदीप रिंधे उपस्थित होते.