शरद मिरे
भिवापूर : सततच्या नापिकीमुळे वाढलेल्या कर्जामुळे हताश व निराश झालेला बळीराजा आत्महत्या करतो. मग सरकार लाख - दोन लाखांची मदत करत, आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन करते. मात्र शासनाच्या तुटपुंज्या मदतीने खरंच पीडित कुटुंबाचं जगणं सुसह्य होते का, हा प्रश्नच आहे. कारण शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर आधार हरवलेली ‘ती’ आता दुसऱ्याच्या शेतात दिवसरात्र कष्ट उपसतेय. ‘ती’ राबत आहे. जगत आहे. केवळ पोटच्या दोन मुलींसाठी!
तालुक्यातील चिखली येथील शेतकरी राजेंद्र डोमाजी पिंपळकर या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून ११ जानेवारी २०१९ रोजी शेतातील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. पत्नी कविताच्या कपाळावरील कुंकू कायमचे पुसले गेले. जान्हवी व साक्षी या चिमुकल्या मुलींचे पालकत्व हरपले. राजेंद्रकडे चार एकर शेती. त्यात कुटुंबाचे पालनपोषण आणि मुलींचे शिक्षण ही जबाबदारी होती. त्यावेळी जान्हवी ११ वीत, तर साक्षी ८ वी मध्ये शिकत होती. आता यातील जान्हवी बी.ए. भाग १ ला, तर साक्षी १० वीमध्ये शिकत आहे. दोन्ही बहिणी दररोज चिखलीवरून एकाच सायकलने भिवापूरला शिक्षणाकरिता येतात. विधवा झालेली मायमाउली कविता मुलींच्या शिक्षणासाठी शेतात कष्ट उपसते. हयातीत असताना राजेंद्र चार एकर शेती वाहायचा, मात्र त्याच्या निधनानंतर कविता एकाकी पडली. त्यामुळे गावालगतची दोन एकर शेती ‘ती’ स्वत: करत आहे, तर लांब असलेली दोन एकर शेती पडीत आहे. त्यातही दोन एकर शेतात पेरलेले पीक कधी कीड व रोगांचा प्रादुर्भाव खाऊन टाकते तर कधी निसर्गाच्या चक्रव्यूहात शेतातील उभे पीक जमीनदोस्त होते. अशा विदारक परिस्थितीत पोटाची खळगी भरून दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याचे मोठे आवाहन कविता पुढे आहे. त्यामुळे ‘ती’ स्वत:च्या दोन एकर शेतात कष्ट उपसत, गावातील इतरांच्या शेतात मजुरीचे काम करते. यातून मिळणाऱ्या मजुरीत ‘ती’ संसारगाडा हाकत आहे.
शेतकरी आत्महत्येचं ‘स’मूळ नष्ट व्हावे!
नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो, तेव्हा घरातील कर्ता पुरुष गेल्याचे दु:ख व वेदना केवळ ‘त्या’ कुटुंबाला माहीत असतात. लाख रुपयांच्या शासकीय मदतीने या वेदना व दु:ख संपत नाही, अशी खंत जान्हवीने ‘लोकमत’कडे व्यक्त केली. त्यामुळे शासनाने शेतकरी आत्महत्येचं ‘स’मूळ नष्ट करावे. कर्ज व नापिकीला कंटाळून शेतकरी बळीराजा भविष्यात आत्महत्येचे पाऊलच उचलणार नाही, अशी व्यवस्था उभी करणे आवश्यक असल्याचे ती म्हणाली.
१० वर्षांत २३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
भिवापूर तालुक्यात गत १० वर्षांतील शेतकरी आत्महत्येकडे बघितल्यास, प्रत्येक वर्षात कधी दोन तर कधी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०१० पासून ९ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत तालुक्यात तब्बल २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यातील २०२० पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त २० कुटुंबांना शासनाकडून प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात आली, तर या वर्षातील आत्महत्येचे ३ प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.