भिवापूर : पुनर्वसनातील शेडमध्ये मुक्कामी असलेल्या कुटुंबाचा निवारा हिरावला जात असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्यासह व्हीआयडीसीचे अधिकारी शुक्रवारी पुनर्वसनस्थळी दाखल झाले. त्यांनी सदर कुटुंबियांशी चर्चा करत त्यांच्या निवासासाठी एक शेड कायम ठेवणार असल्याचे आश्वस्त केले. मात्र इतर शेड काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुनर्वसन स्थळावरील पीडित दहा कुटुंबांचे वास्तव ‘लोकमत’ने गत दोन दिवस मांडले. यावरून व्हीआयडीसीच्या कार्यपद्धतीवर टीकाही झाली. माजी आ. सुधीर पारवे यांच्यासह सदर ग्रामपंचायतीने व्हीआयडीसीला पत्रव्यवहार करत शेड कायम ठेवण्याची मागणी केली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्यासह व्हीआयडीसीचे अधिकारी एस. के. येनरकर, नीलिमा हांडे, नायब तहसीलदार दिनेश पावर आदी गाडेघाट, घाटउमरी पुनर्वसनात दाखल झाले. येथे पीडित कुटुंबियांशी त्यांनी चर्चा केली. या पुनर्वसनात सध्या चार मोठी शेड उभी आहेत. त्यापैकी १० कुटुंबे राहण्याची सोय असलेले एक मोठे टिनाचे शेड सदर कुटुंबाच्या वास्तव्यासाठी कायम ठेवत असल्याचे व्हीआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तर उर्वरित शेड काढून तातोली पुनर्वसनात नेण्यात येणार आहेत. तेथे सुध्दा प्रकल्पग्रस्तांच्या वास्तव्यासाठी शेडची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कायमस्वरूपी नसला तरी, तात्पुरता दिलासा पीडित कुटुंबियांना मिळाला आहे.
भूखंडासाठी पाठपुरावा आवश्यक
सदर कुटुंबांना कायमस्वरूपी पट्टे मिळण्याच्यादृष्टीने शासकीय स्तरावर कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून सातत्यपूर्ण पाठपुरावा होणे आवश्यक आहे. या कुटुंबाना भूखंड न मिळाल्यास वारंवार त्यांच्या वास्तव्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे.
===Photopath===
040621\img_20210604_123403.jpg
===Caption===
तहसीलदार अनिरूध्द कांबळे व व्हीआयडीसीचे अधिकारी पिडीत कुटुंबांशी चर्चा करतांना