लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेलंखेडी, रामनगर येथील हनुमान मंदिर परिसरात मागील तीन वर्षापासून अतिक्रमण करून बांधण्यात आलेले डेकोरेशन मालकाचे शेड बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार धरमपेठ झोनच्या अतिक्रमण पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अतिक्रमण विभागाचे जमशेद अली, प्रदीप होले आदी उपस्थित होते.महापौर संदीप जोशी यांच्या जनता दरबार, वॉक अँड टॉक विथ मेयर अशा विविध जनसंवाद कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणाच्याच येत असल्याने त्यांनीही याच गंभीर दखल घेतली. महापौरांनी नागरिकांच्या तक्रारींबाबत वेळोवेळी प्रशासनाच्या बैठकी घेउन अतिक्रमण हटविण्याबाबत निर्देश दिले होते. आयुक्तांनीही अतिक्रमणबाबत गंभीर भूमिका घेतली आहे. याचीच प्रचिती यातून आली.तेलंखेडी, रामनगर येथे असलेल्या हनुमान मंदिराच्या परिसरात एका बाजूला देवांश डेकोरेशनच्या मालकाद्वारे डेकोरेशनचे साहित्य ठेवण्याकरिता मोठे अनधिकृत शेड बांधले होते. संपूर्ण शेड लाकडाचे व त्यामधील साहित्यही लाकडी व कापडीच असल्याने परिसरात मोठी दुर्घटना होणयाचा धोका होता. सदर बांधकाम हटविण्याबाबत हनुमान मंदिर सार्वजनिक सुधार संस्थेद्वारे अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मनपाच्या अतिक्रमण विभागाद्वारेही अनेकदा नोटीस देण्यात आले होते. मात्र डेकोरेशन मालकाद्वारे याकडे दुर्लक्ष करण्यात आले.तुकाराम मुंढे यांनी देवांश डेकोरेशनचे अनधिकृत शेड त्वरित काढण्याचे आदेश उपायुक्त व झोनच्या सहायक आयुक्तांना दिले. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
नागपूरच्या तेलंखेडी हनुमान मंदिर परिसरातील शेड तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:03 AM
तेलंखेडी, रामनगर येथील हनुमान मंदिर परिसरात मागील तीन वर्षापासून अतिक्रमण करून बांधण्यात आलेले डेकोरेशन मालकाचे शेड बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडले.
ठळक मुद्देधरमपेठ झोनच्या पथकाद्वारे कारवाई