लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीएसआयआर’च्या (कौन्सिल आॅफ इंडस्ट्रीअल अॅन्ड सायंंटिफिक रिसर्च) महासंचालकपदी डॉ.शेखर मांडे यांची निवड करण्यात आली आहे. ५६ वर्षीय डॉ.मांडे हे मूळचे नागपूरकर असून त्यांच्या निवडीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. ‘एसीसी’तर्फे (अपॉईन्टमेंट्स कमिटी आॅफ कॅबिनेट) डॉ.मांडे यांची निवड करण्यात आली. डॉ.मांडे यांच्याकडे मागील ८ वर्षांपासून पुणे येथील ‘नॅशनल सेंटर आॅफ सेल सायन्स’च्या संचालकपदाची जबाबदारी होती.भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.चिंतामण मांडे यांचे ते पुत्र आहेत. डॉ.शेखर मांडे यांनी १९८२ साली नागपूर विद्यापीठातून ‘बीएस्सी’ पदवी घेतली. त्यानंतर विद्यापीठातूनच त्यांनी भौतिकशास्त्र विषयात ‘एमएस्सी’ पूर्ण केले. बंगळूरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स’मधून त्यांनी ‘मॉलिक्युलर बायोफिजिक्स’मध्ये ‘पीएचडी’ संशोधन केले. त्यानंतर नेदरलॅन्ड येथील ग्रोन्गिंगेन येथे ‘पोस्ट डॉक्टरल फेलो’ (१९९१-१९९२), युनिव्हर्सिटी आॅफ वॉशिन्टन येथे ‘सिनिअर फेलो’ (१९९२-१९९५), चंदीगड येथील ‘इन्स्टिट्यूट आॅफ मायक्रोबिअल टेक्नोलॉजी’ येथे वैज्ञानिक (१९९५-२००१), हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटींग अॅन्ड डायग्नोस्टिक्स’ येथे वैज्ञानिक इत्यादी महत्त्वाचे अनुभव त्यांनी घेतले. २००५ मध्ये त्यांना वैज्ञानिक क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या एस.एस.भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते संघप्रणित विज्ञान भारतीचे उपाध्यक्षदेखील आहेत. गिरीश साहनी यांच्या निवृत्तीनंतर मागील दीड महिन्यापासून ‘सीएसआयआर’चे महासंचालकपद रिक्त होते.