लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - ॲलोव्हेराचे पीक देण्याच्या नावाखाली योजनाबद्ध पद्धतीने हजारो लोकांना कोट्यवधीचा चुना लावणारा ठगबाज विजय शेळके कटकारस्थान करूनच पळाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्याच्या पलायनाचा कट आधीच रचण्यात आला असावा आणि या कटात शेळकेच्या काही साथीदारांचाही सहभाग असावा, असा संशय आहे. हृदयरुग्ण असलेल्या शेळकेला उपचारासाठी २१ डिसेंबरला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्याने शौचालयाला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. त्याला शोधण्यासाठी अजनी तसेच गुन्हे शाखेचे पोलीस कामी लागले आहेत. पलायनाला ३६ तासापेक्षा जास्त अवधी झाला, मात्र तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एखादा हृदयरोगी त्यातल्यात्यात असा व्हाईट कॉलर गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याची ही पहिलीच घटना आहे. शेळके अत्यंत धूर्त आहे. त्याने तीन वर्षांपूर्वी गोविंदा डेव्हलपर्स ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच ॲग्रो फार्मिंग नावाने फर्म उघडून समुद्रपूर(जि. वर्धा)जवळच्या शेतात ॲलोव्हेरा प्लांट बनविला होता. येथे अल्पावधीत लाखोंचा नफा मिळवून देण्याची थाप मारून शेळके आणि साथीदारांनी हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केले होते. तक्रारी वाढल्यानंतर या प्रकरणात तपास करून गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने शेळकेला अटक केली होती. हृदयरुग्ण असलेल्या शेळकेने प्रकृतीची तक्रार केल्याने त्याला उपचारासाठी सुपर स्पेशालिटीत भरती करण्यात आले होते. त्याच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी दोन पोलिसांवर होती. अशात रविवारी भल्या सकाळी कडाक्याची थंडी असताना तेथून सहजपणे पळून जाण्याचा आणि नंतर पोलिसांच्या हाती न लागण्याचा प्रकार संशयास्पद ठरतो. त्याला पळवून नेण्यात आले असावे आणि हा गुन्हा पूर्वनियोजित कटानुसार करण्यात आला असावा, असा संशय आहे. दरम्यान, शेळकेवर दुर्लक्ष केल्यामुळे तो पळून गेल्याचा ठपका ठेवत दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
कुठे पळाला शेळके
शेळकेचे पलायन योजनाबद्ध पद्धतीनेच झाल्याचा अंदाज असला तरी, तो नेमका कशाने आणि कुठे पळून गेला, ते अद्याप उघड झालेले नाही. शेळकेच्या पलायनासाठी वाहन कुणी आणले, त्याची माहिती शेळकेच्या निकटवर्तीयांकडून मिळविण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहेत.