गडचिरोली : येत्या ४ मार्चला भारतात येण्याचे माझे तिकीट बुक आहे. पण २४ फेब्रुवारीला रशियाने युद्ध सुरू केले आणि सर्व परिस्थितीच बदलली. आज आम्ही सुरक्षित असलो तरी उद्या काय होईल, हे माहीत नाही. तूर्त सावध करणाऱ्या सायरनच्या आवाजानिशी होस्टेलच्या तळघरात आश्रय घेण्यापलिकडे आमच्या हातात काही नाही. असे असले तरी ही परिस्थिती बदलेल आणि सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेली गडचिरोलीच्या स्मृती रमेश सोनटक्के हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
स्मृती हिच्यासह दिव्यानी सुरेश बांबोळकर आणि तनुश्री रामकृष्ण कर अशा तीन विद्यार्थिनी युक्रेनमध्ये एमबीबीएस करत आहेत. किव्ह शहरापासून ३०० किलोमीटरवर असलेल्या व्हिनित्सिया येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या स्मृतीसोबत शुक्रवारी संध्याकाळी ‘लोकमत’ने संवाद साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली.
यावेळी स्मृती म्हणाली, आम्ही राहात असलेल्या शहरात प्रत्यक्ष युद्धाच्या झळा पोहोचलेल्या नाही. तरीही आम्ही जीवनावश्यक साहित्याचा साठा करून ठेवला आहे. अधूनमधून सायरन वाजवून नागरिकांना सावध केले जाते असे ‘लोकमत’शी बोलत असतानाच सायरनचा आवाज कानी पडला आणि स्मृतिला होस्टेलच्या आत जावे लागले. विद्यार्थ्यांचे व्हॉट्स ॲप ग्रुप, कॉलेजचे डीन, भारतीय दूतावास यांच्याकडून वेळोवेळी अपडेट्स मिळत असल्याचे तिने सांगितले.