नरेश डोंगरेनागपूर : रात्रीची वेळ आकाशात वीज चवताळल्यासारखी वारंवार कडाडत होती. खाली छातीएवढे पाणी वरवर चढतच होते. वरच्या रूममध्ये एक महिला व मुलगा मदतीसाठी याचना करीत होती. बचाव पथकांचे क्रमांक व्यस्त होते. परिणामी तीन तासांपासून मदतीच्या प्रतिक्षेत असलेली महिला आणि मुलगा जीवाच्या भितीने ईश्वराची करुणा भाकत होती. अशात शेरदिल खाकी अर्थात यशोधरानगरचे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर तेथे पोहोचले व जीवाची बाजी लावून तीव्र प्रवाहातून जाऊन त्यांनी धंतोली परिसरात अडकलेल्या मायलेकाचे प्राण वाचविले.
छातीएवढ्या पाण्यातून सुरक्षित स्थळी n ठाणेदार भेदोडकर यांनी वाहनातील नायलॉनचा दोर कंबरेच्या बेल्टला बांधला अन् छातीभर पाण्याच्या तीव्र प्रवाहातून पलिकडच्या इमारतीकडे पोहत निघाले. चित्रपटगृहाच्या एक्झिट गेटवरून वरच्या रुमकडे चढले. n अंधारात केवळ मदतीसाठी ओरडणाऱ्या मायलेकाचे आवाज ऐकू येत होते. भेदोडकरांनी मोबाईलचा टॉर्च सुरू करून समोर येण्याचे आवाहन केले. त्यानुसार प्रचंड घाबरलेले मायलेक समोर आले. एक - एक करून १६ वर्षीय मुलगा व महिलेला छातीएवढ्या पाण्यातून त्यांनी सुरक्षितस्थळी नेले.
चित्रपटगृहाची मालकीणजीवदान मिळालेल्या महिलेचे नाव सुनीता तिवारी असून त्या जानकी चित्रपटगृहाच्या मालकीण आहेत. दोघेच मायलेक सध्या तेथील एका रूममध्ये राहायला होते. आपला जीव वाचला, यावर त्यांचा बराच वेळ विश्वास बसत नव्हता. भानावर आल्यानंतर त्या सारख्या पाया पडत आभार व्यक्त करीत होत्या.
घरी निघताना आला कॉलपोलिस अधिकाऱ्याने केलेल्या मदतकार्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाणेदार भेदोडकर यांच्यावर रियल हिरो म्हणून कोतुकाचा वर्षाव होत आहे. भेदोडकर नाईट राउंड संपवून घराकडे निघण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात कंट्रोलने वायरलेसवर कॉल दिला.
एका इमारतीच्या आत एक महिला आणि मुलगा अडकला आहे. त्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर अनर्थ होऊ शकतो, असा हा कॉल होता. तो ऐकताच ठाणेदार भेदोडकरांनी आपल्या सहकाऱ्यांना पोलीस वाहन धंतोलीतील जानकी चित्रपट गृहाकडे घेण्याची सूचना केली. काही वेळेतच ते तेथे पोहचले.