महापूर आला त्या रात्री सर्वजण गाढ झोपेत होते. मी १८ वर्षांचा होतो. पूर पहाटे आला. घरी सर्वच होते. घर मोठे व पक्के असल्याने ५० ते ६० लोक घरी जमा झाले होते. पाण्याचा प्रवाह भयानक असल्याने घर फाउंडेशनसह वाहून गेले. त्यात सगळ्यांचा समावेश होता. मी वाहत असताना सुदैवाने मला लाकूड सापडले. त्याला पकडून प्रवास सुरू झाला. कुठेना कुठे मृत्यू असल्याने हिंमत न खचता ६ किलोमीटर वाहत गेल्यानंतर शेवटी देवग्रामजवळ एका झाडाला अडकलो. त्याच झाडावर चढलो. त्यावर साप होता. मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे माझे प्राण वाचले. पूर कमी झाला. लोक पूर पाहायला आले. मला ६ वाजता उतरून घरी आणण्यात आले. १२ तास मृत्यूशी झुंज दिली. घरी आलो तेव्हा घरी कोणीच नव्हते, सर्वांना जलसमाधी मिळाली होती.
- प्रकाश आनंदराव बेले, मोवाड
आजही पती व मुलीच्या प्रतीक्षेत
३० जुलै १९९१ च्या महापुराच्या आठ दिवसांपूर्वी मी माझ्या अडीच वर्षांच्या मुलाची प्रकृती बरी नसल्याने माहेरी बेलोना येथे गेली होती. माझे पती, सासू व मुलगी घरी होते. महापुराची माहिती मिळाली, पण लहान बाळ असल्यामुळे येऊ शकली नाही. भासऱ्यांनी महापुराची माहिती दिली. त्यात माझा पूर्ण परिवार वाहून गेला होता. पतीला शेवटचे पाहीले मिळेल, या आशेने मी धावदडप करत होती. २ दिवस, ४ दिवस तर आज ३० वर्षे होऊनही मी माझे पती शिवरामजी व मुलगी अल्काची प्रतीक्षा करीत आहे.
- अनुसया क्षीरसागर, मोवाड
२९ जुलै १९९१ची रात्र मोवडवासीयाकरिता काळरात्र ठरली. माझे आई वडील दोघेच घरी होते. मी अमरावतीला होतो. ३० जुलैला सकाळी महापुराची माहिती कळली. घर नदीपासून जवळच होते. मनात धास्ती भरली. आई वडिलांचे काय झाले असेल ही चिंता वाटू लागली. तातडीने गावाला पोहोचलो. सर्वत्र पाणीच. मृतदेहाचा सडा, हंबरडाच फुटला, घर पूर्णपणे वाहून गेले होते. बाजारातील दुकानही जमीनदोस्त झाले. आईवडील कुठेच दिसत नव्हते. कोण जिवंत आहे कोण वाहून गेले याचा अंदाज येत नव्हता. अशात आईवडील नरखेडला सुखरूप असल्याची माहिती मिळाली. मात्र आप्तस्वकीय व मित्रपरिवाराच्या कुटुंबाना जलसमाधी मिळाली होती. आजही त्या आठवणींनी अंगावर शहारे येतात.
नरेंद्र लिखार, माजी नगराध्यक्ष, मोवाड