नागपूर : मेयोचा सर्जिकल कॉम्प्लेक्समधील कोरोनाचा रुग्णांना इतरत्र स्थानांतरित (शिफ्ट) करून तिथे ‘नॉनकोविड’ रुग्णांची भरती करण्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने मंगळवारपासून पुकारलेला सामूहिक रजा आंदोलन (संप) अखेर शुक्रवारी सायंकाळी मागे घेतले. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी सर्जिकल कॉम्प्लेक्समधील कोरोनाच्या २५ रुग्णांना वॉर्ड क्र. ५ व ६ मध्ये दाखल केले.
मेयो हे ‘टर्शरी केअर सेंटर’ असताना मागील दीड वर्षांपासून केवळ कोरोनाचे रुग्ण पाहात असल्याने ‘स्पेशालिस्ट’ डॉक्टर होण्यासाठी लागणारे शिक्षण, कौशल्य व अनुभव मिळत नसल्याचा निवासी डॉक्टरांच्या तक्रारी होत्या. कोविड रुग्णालय असलेल्या सर्जिकल कॉम्प्लेक्समधून कोरोना रुग्णांना इतरत्र शिफ्ट करून त्या ठिकाणी ‘नॉनकोविड’ रुग्णांना भरती करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली. परंतु प्रशासन गंभीर नसल्याचे पाहत १ जूनपासून सामूहिक रजा आंदोलनाला सुरुवात केली. यात २३० निवासी डॉक्टर सहभागी झाल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली. संपावर तोडगा काढण्यासाठी ३ जून रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी निवासी डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना सर्जिकल कॉम्प्लेक्समधील कोरोनाचा रुग्णांना इतरत्र स्थानांतरित करण्याचा सूचना केल्या. परंतु आश्वासन नको, अॅक्शन हवी यावर डॉक्टर अडून बसले. ४ मे रोजी अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी सर्जिकल कॉम्प्लेक्समधील २५ रुग्णांना वॉर्ड क्र. ४ व ५ मध्ये शिफ्ट करताच सायंकाळी निवासी डॉक्टरांनी संप मागे घेऊन रुग्णसेवेत रुजू झाले. सध्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये कोरोनाचे आठ रुग्ण व्हेंटिलेटरवर, सारीचे ४६ तर म्युकरमायकोसिसचे ४६ रुग्ण उपचार घेत आहेत.
-‘नॉनकोविड’च्या रुग्णांसाठी सर्जिकल कॉम्प्लेक्स खुले
सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये आता कोरोनाचे रुग्ण नाहीत. यामुळे अस्थिव्यंगोपचार, कान, नाक व घसा विभाग, नेत्ररोग विभाग व शल्यचिकित्सा विभागाशी संबंधित रुग्णांना दाखल केले जाणार आहे. याचा फायदा रुग्णांसोबतच निवासी डॉक्टरांना होईल.
-डॉ. रजत अग्रवाल, अध्यक्ष मार्ड मेयो