नागपूर : केळीबाग रोडच्या रुंदीकरणाच्या कामात झालेल्या बेजबाबदारपणाचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच पीडब्ल्यूडी आणि महावितरण सक्रिय झाले आहे. पीडब्ल्यूडीने उघड्यावर पडलेल्या केबलला झाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर महावितरणने रस्ता तयार करीत असलेल्या एजन्सीला पत्र लिहून आधी विजेचे केबल शिफ्ट करा मगच रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी खोदकाम करण्यासाठी कळविले आहे.
‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करुन केळीबाग रस्त्याच्या कामात बेजबाबदारपणा होत असल्याचे उघड केले होते. रुंदीकरणासाठी झालेल्या खोदकामात ११ केव्ही क्षमतेचे वीजेचे केबल वर आल्याची बाब पुढे आणली होती. हे केबल उघडे पडले होते. काही ठिकाणी केबलच्या वर रस्ता तयार केला आहे. यामुळे परिसरात अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर महावितरणने एजन्सीला पत्र लिहून रस्ता तयार करण्यासाठी नियमानुसार वीजेचे केबल शिफ्ट केल्यानंतरच खोदकाम करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास विजेचे केबल फुटून ग्राहकांची वीज गुल होते. अपघाताची शक्यताही निर्माण होते. दरम्यान महावितरण आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली. दुसरीकडे टाऊन हॉलजवळ उघड्यावर पडलेले केबल झाकण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सकाळी केबलला गिट्टी टाकुन झाकण्यात आले. महावितरणने यावर आक्षेप नोंदवून गिट्टी टाकल्याने केबल खराब होऊ शकत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर गिट्टी काढण्यात आली. पीडब्ल्यूडीचे उप अभियंता अतुल गोटे यांनी सांगितले की, केबलला हॉफ राऊंड पाईपने झाकून त्यास माती आणि गिट्टीने झाकण्यात येईल. तसेच रस्त्याच्या खालील केबल हटवून ते रस्त्याच्या काठावरील सर्व्हिस लाईनमध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
..........
शिफ्टींगसाठी निर्माण झाला पेच
विजेच्या लाईनच्या शिफ्टिंगबाबत पेच निर्माण झाला आहे. हे काम पीडब्ल्यूडी सेंट्रल रोड फंड (सीआरएफ)मधून करीत आहे. परंतु सीआरएफ नुसार विजेच्या लाईनची शिफ्टिंग येत नाही. ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरणने सहा महिन्यांपूर्वी महापालिकेला शिफ्टीिग करण्यास सांगितले होते. परंतु अद्याप हे काम करण्यात आलेले नाही.
..........