नागपूर : येथील रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम झपाट्याने सुरू असून आतापर्यंत पाईप लाईन शिफ्टिंगसह जमिन लेवलची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. भारतीय रेल्वेने प्रमुख स्थानकांच्या सुधारणा / पुनर्विकासाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजने अंतर्गत नागपूर स्थानकाची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, ४८७.७७ कोटींच्या कामांना आता गती आली आहे.
जुन्या शॉर्ट साइडिंगचे विघटन आणि पुनर्स्थापना पूर्ण झाली. जुन्या वास्तू पाडून त्याच्या मलब्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पिल्लर उभारण्यासाठी आवश्यक असलेले खंदक व ईतर खोदकाम काम सुरू झाले असून इलेक्ट्रिकल केबल्स, पाणी आणि सीवरेज पाइपलाइनचे युटिलिटी शिफ्टिंगही पूर्ण झाले आहे. तत्पूर्वी, ड्रोन सर्वेक्षण, स्थलाकृतिक सर्वेक्षण आणि वृक्ष सर्वेक्षण तसेच नॅरोगेज प्लॅटफॉर्म आणि शेड पाडण्याचेही काम पूर्ण झाले आहे.
पुढच्या टप्प्यातील कामे
या स्थानकाचे पुनर्विकासाचे काम करतानाच स्थानकाची आयकॉनिक हेरिटेज वास्तू जतन करून तिचे मूळ वैभव प्राप्त करून देण्याचे मुख्य काम पुढील टप्प्यात करायचे आहे. सोबतच येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता प्रवाशांचे आगमन आणि निर्गमनाचा मार्ग प्रशस्त करणे आणि या स्थानकाला मेट्रो तसेच वाहतुकीच्या इतर साधनांशी जोडण्याचे नियोजन केले जात आहे. ड्रॉप-ऑफ आणि पिक-अप क्षेत्र अधिक प्रशस्त करण्याचेही नियोजन सुरू आहे.
हे होणार बदल
बाधंकाम करताना पश्चिम बाजूच्या स्थानकाच्या इमारतीत फेरफार आणि पूर्व बाजूच्या इमारतीत फेरबदल केले जाणार आहे. सध्याची आसनक्षमता आणि प्रतिक्षालयातही बदल होणार आहे. नव्या बदलात पश्चिम आणि पूर्व बाजूला बेसमेंट पार्किंग होणार आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मच्या वरील रूफ प्लाझा कॉन्कोर्स विकसित केला जाणार आहे.
काय होणार नवीन
२ नवीन एफओबी (फूट ओव्हर ब्रिज), दिव्यांगजनांना अनुकूल अशी व्यवस्था. त्यासाठी २८ नवीन लिफ्ट आणि ३१ नवीन एस्केलेटर या स्थानकावर बसवले जाणार आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि प्रवेश नियंत्रण व्यवस्था, सौर ऊर्जा, जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंगसह प्रदुषण मुक्त (हरित) इमारती होणार आहे.