लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षक सहकारी बँकेचे अकाऊंट हॅक करून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सुटीच्या दिवशी ३० लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. ही रक्कम दिल्ली भोपाळसह विविध शहरातील वेगवेगळ्या बँक खात्यात वळती करण्यात आली. सतर्क बँक प्रशासनाने वेळीच आवश्यक उपाययोजना केल्याने सायबर टोळीचा डाव उधळला गेला.प्राप्त माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने बँकेचे व्यवहार बंद होते. ही संधी साधून सायबर गुन्हेगारांनी सकाळी ९.३० च्या सुमारास बँकेचे अकाउंट हॅक करून ३० लाख, १३ हजार, १७० रुपये नेट बँकिंगच्या माध्यमातून ट्रान्सफर करून घेतले. ही रक्कम आरोपी असरीफ खान याच्या नवी दिल्लीतील साऊथ इंडियन बँकेच्या खाते क्रमांक ०२२१०५३०००२४३५२ मध्ये, रजनी शर्मा भोपाळच्या इंडसन बँकेतील खाते क्रमांक १५८३५९८२०२५८ मध्ये, ए. जी. प्लास्टिक इंडस्ट्रीज दिल्लीच्या खाते क्रमांक ९१६०२०० ४०५१८६३१ मध्ये, शाईन छाबरा, नवी दिल्लीच्या युनियन बँकेच्या खाते क्रमांक ५४२८०२० १३०००३४१२ मध्ये, वरुण गुप्ता नवी दिल्लीच्या खाते क्रमांक ४०७८००० १००२८८०६२ मध्ये आणि विजय सोना पुणे याच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खाते क्रमांक ७२१२४५२५५९ मध्ये वळते करण्यात आले. त्यातील ५ लाख २१०० रुपये आरोपींनी लगोलग काढून घेतले.
सतर्कतेमुळे वाचली रक्कमनेटबँकिंगचा हा व्यवहार झाल्याचे काही तासातच बँक प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे बँकेच्या अधिकारी पदाधिका-यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या. पोलिसांच्या सायबर शाखेत तातडीने संपर्क करून संबंधित बँकेच्या अधिका-यांशी संपर्क साधण्यात आला. त्यामुळे उपरोक्त आरोपींचे नमूद खाते तातडीने फ्रीज करण्यात आले. परिणामी बँकेचे २५ लाख, ११ हजार, ७० रुपये बचावले. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर सायबर शाखेच्या अधिका-यांनी बँकेचे महाव्यवस्थापक विनोद मारोतराव लोहकर (वय ७०, रा.त्रिमूर्तीनगर) यांची तक्रार गणेशपेठ ठाण्यात वर्ग केली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सहायक निरीक्षक नानवे यांनी लोहकर यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध कलम ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.