नागपूर : प्रहारचे आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. त्यांच्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघानांही एकत्र बसवून वाद मिटवतील, असा दावा करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला समर्थन देणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी १ नोव्हेंबरला वेगळा निर्णय घेण्याचा इशारा बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत दिला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सरकारला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले. भाजपसोबत १६४ आमदार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे हे आपले कार्यकर्ते तुटू नयेत, यासाठी सरकार पडण्याच्या वल्गना करीत असून यासाठीच संभ्रम निर्माण करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी राज्यभर दौरा करीत आहे. प्रत्येक दौऱ्यात या तीनही पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. भाजपकडे फ्लो वाढत चालला आहे. त्यामुळे या तीनही पक्षांतील नेते अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरे यांना इव्हेंट मॅनेजमेंटची सवय आहे. जेव्हा सरकारमध्ये अडीच वर्षे संधी होती, तिचे सोने करण्याऐवजी माती केली. आता केवळ पेंग्विन सेना घेऊन टिव-टिव सुरू आहे. कोल्हापूरच्या पुरात फडणवीस यांनी एनडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन दुप्पट-चारपट मदत केली. उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असताना कधीतरी एनडीआरच्या निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे का? हे काम त्यांना करता आले नाही. फेसबुक लाइव्ह न करता ते राज्यभर फिरले असते, आमदारांना सांभाळले असते तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती, असा चिमटाही त्यांनी काढला.
आ. राणांनी केलेल्या आरोपांची ईडी, सीबीआय चौकशी व्हावी : लोंढे
- आ. रवी राणा यांनी माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. रवी राणा यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. रवी राणा हे आमदार या संवैधानिक पदावर असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा चिमटाही लोंढे यांनी काढला आहे.