नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात १० वर्षांत भारत बदलला आहे आणि जगाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. १० वर्षांपूर्वी आपण १० वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होतो. आता आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर येऊ, असे मत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केले.मंथन आणि विश्वमंथन संस्थेतर्फे ‘जिओपॉलिटिक्समध्ये भारताचा उदय’ या विषयावर कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम्स, आयटी पार्क येथे शनिवारी चर्चासत्र झाले. यावेळी जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत कसा मजबूत झाला आहे, याचा ऊहापोह केला.
मोदी सरकारमुळेच मिळाले हे यश... परराष्ट्र धोरणातील सर्वांत मोठे यश म्हणजे आखाती देशांसह अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांच्याशी संबंधांमध्ये झालेली सुधारणा. अबुधाबीमध्ये एक स्वामिनारायण मंदिर उभारले गेले. कोविडच्या काळात आखाती देशांनी तेथील भारतीयांची काळजी घेतली. अमेरिकेसोबत पूर्वी संबंध तेवढे चांगले नव्हते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ते सुधारू लागले. आता अमेरिकेतील उद्योगांना भारताचे महत्त्व पटले आहे. ऑस्ट्रेलियाशीही चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत.