लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोघलांच्या जाचातून क्रांतीची मशाल पेटवत जनसामान्यांमध्ये जगण्याची चेतना निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिन जनमानसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाल येथील गांधीगेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्थात शिवतीर्थावर पारंपरिक व साधेपणाने हा सोहळा पार पडला.अनेक संस्थांचा सहभाग असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी भारतीय कालगणनेनुसार अर्थात पंचांग तिथीनुसार छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. ढोल-ताशे-नगाडे, कवायती, शिवकालीन युद्धाभ्यास, गायन आदींच्या आयोजनातून नयनाभिरम्य अशी वातावरणनिर्मिती होत असते. मात्र, यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट पसरले आहे. अशा स्थितीत नैतिकता जपत आणि शासन-प्रशासनाच्या तणावात वाढ होऊ नये म्हणून समितीने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४७ वा शिवराज्याभिषेक सोहळा दिन अत्यंत साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला. सकाळी ७ वाजता वेदमंत्र व पंचामृताने अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर कोव्हिड योद्धांच्या हस्ते महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण झाले. आरती, शिवस्तुती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
यावेळी देखण्या अशा संस्कार भारती रांगोळीने परिसर सजविण्यात आला होता. यावेळी सफाई कामगार पांडुरंग गडीकर, परिचारिका सुनिता भोयर, पोलीस कर्मचारी अंकुश चौधरी व डॉ. रुद्रेश चक्रवर्ती या कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार करण्यात येऊन, त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सोहळ्याला नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून आधीच सूचना प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने समितीच्या संबंधित आॅनलाईन संकेतस्थळावरून हा कार्यक्रम सर्वत्र प्रसारित करण्यात आला.