नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त जिल्ह्यात महानाट्याचे आयोजन तसेच पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. शुक्रवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आयोजनाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहामध्ये या संदर्भात आयोजन समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
नागपूर महानगर, नागपूर ग्रामीण, रामटेक व अन्य ठिकाणी या महोत्सवाच्या आयोजन स्थळाची चाचपणी करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आयोजक असणाऱ्या सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत योग्य स्थळाची निवड करण्यात येत आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम यांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवाय्यांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आयोजना संदर्भातील तारखा लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.