Aaditya Thackeray News: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशानाच्या निमित्ताने सर्व आमदारांचे एक फोटोसेशन घेण्यात आले. मात्र, त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहिले नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नोत्तरात आदित्य ठाकरे यांनी असा एक प्रश्न विचारला की, तिथे उपस्थित असलेले सारेच जण अवाक् झाले.
मीडियाशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जे फोटोसेशन झाले त्यात सहभागी होण्याची माझी इच्छा नव्हती, मन नव्हते. आधीच्या फोटोसेशनमध्ये सहभागी होतो. घटनाबाह्य सरकार जिथे निर्माण झाले आहे आणि पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री बसले आहेत, तिथे फोटो काढावा असे वाटले नाही. मागची रांग की पुढची रांग याने मला काही फरक पडत नाही कारण माझे वडील उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही मी मागच्याच रांगेत उभा होतो, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
कोणत्या भाषेत उत्तरे हवीत? इंग्रजी, हिंदी की...
यानंतर आदित्य ठाकरे यांना हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रतिक्रिया देण्याची विनंती करण्यात आली. त्याचवेळी तुम्हाला कोणत्या भाषेत उत्तरे हवी आहेत? इंग्रजी, हिंदी की फ्रेंच असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला. तसेच एक-दोन वाक्य फ्रेंच भाषेत बोलूनही दाखवली. आदित्य ठाकरेंच्या या अचानक गुगलीमुळे उपस्थित सारेच आश्चर्यचकीत झाले.
दरम्यान, ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, ज्यांनी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्याबाहेर घालवला अशा लोकांसह उभं राहून मला फोटो काढायचा नव्हता. सिनेटची निवडणूक असो, लोकसभेची निवडणूक असो किंवा कुठलीही निवडणूक असो हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरते. या सरकारने महाराष्ट्रात लोकशाही मोडीत काढली आहे. कुठलीच निवडणूक घ्यायला निवडणूक आयोग आणि हे सरकार तयार आहे असे दिसत नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.